areeb-main1
‘इसिस’ या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याच्या आरोपावरून एनआयएच्या (राष्ट्रीय तपास यंत्रणा) ताब्यात असणाऱ्या आरिफ माजिदच्या कोठडीत मुंबई उच्च न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत वाढ केली. न्यायालयाने सोमवारी दिलेल्या या निकालामुळे ‘एनआयए’ला आरिफची चौकशी करण्यासाठी आणखी काही काळ मिळाला आहे. सध्या त्याच्यावर भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमांनुसार आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेत सामील होणे आणि देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
तत्पूर्वी, आरिफच्या कुटुंबियांनी त्याच्या बचावासाठी ‘जमात-ए-उलेमा-ए हिंद’ या स्वयंसेवी संघटनेकडे कायदेशीर मदतीची मागणी केली होती. मुस्लिम समाजातील व्यक्तींना कायदेशीरबाबींसाठी मदत पुरविण्याचे काम ही संघटना करते. इजाझ माझिद यांच्याकडून कायदेशीर मदतीसाठी आम्हाला विचारणा करण्यात आल्याची कबुली ‘जमात-ए-उलेमा-ए हिंद’चे सचिव गुलझार अहमद आझमी यांनी दिली.
त्यानुसार, वाहब खान हे न्यायालयात आरिफची बाजू मांडणार आहेत. ११ जुलै २००६ रोजी मुंबईत झालेल्या साखळी स्फोटांतील पाच आरोपींचे वकीलपत्रही वाहब खान यांच्याकडेच आहे. कल्याण येथे राहणारा आरिफ आपल्या तीन मित्रांसह काही महिन्यांपूर्वी इराकमधील कथित धर्मयुद्धात सहभागी होण्यासाठी गेला होता. मात्र, गेल्याच महिन्यात तो भारतात परतला. त्यानंतर एनआयएने विमानतळावरच त्याला ताब्यात घेतले.