गोरेगावातील तरुणाला मराठी भाषक असल्यामुळे बिल्डरने सदनिका न विकल्याच्या प्रकरणाची मुंबई पोलीसांनी दखल घेतली असून, या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने मालाड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयांना दिले आहेत.
गोरेगाव लिंक रोडवर राहणाऱया वैभव रहाटे या तरुणाला मालाड एसवी रोड येथील एक सदनिका विकत देण्यास बिल्डरने नकार दिला होता. मराठी भाषक असल्यामुळेच बिल्डरने ही सदनिका आपल्याला विकली नाही, असा आरोप रहाटे याने केला. या घटनेनंतर वैभव रहाटे मालाड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविण्यासाठी गेला. मात्र, पोलीसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यावर कॉंग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांनी मालाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.