मान्सूनच्या आगमनानंतर पहिल्यांदाच  मुसळधार पावसाला सामोरे जाणाऱ्या रेल्वेची वाहतूक गुरुवारी विविध कारणांमुळे विस्कळीत झाली. रेल्वे रूळ बदलण्यासाठी वापरले जाणारे टीआरटी नावाचे अजस्र यंत्र ट्रान्स हार्बर मार्गावर बंद पडले आणि हा मार्ग ऐन सकाळी गर्दीच्या वेळी चार तास बंद पडला . त्यानंतर पश्चिम रेल्वेवर पावसामुळे आणि एक प्रवासी प्लॅटफॉर्म व गाडी यांमधील पोकळीत अडकल्याने गोंधळ सुरू होता. मध्य रेल्वेवर तर सध्या डीसी-एसी परिवर्तनानंतरचा परिणाम म्हणून गाडय़ा दिरंगाईनेच धावत आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी पाणी न तुंबता रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती.
ट्रान्स हार्बर मार्गावर गोंधळ
मध्य रेल्वेने आपले टीआरटी यंत्र गुरुवारी मध्यरात्री ऐरोलीजवळ आणले होते. हे यंत्र पहाटे ५.५०च्या सुमारास रेल्वेमार्गावरच बंद पडून रुळावर घसरले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक सकाळपासून बंदच होती. जुने रूळ काढून नवीन रूळ टाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या यंत्राची चाके रुळावरून घसरली. त्यानंतर या चाकांमधील लोखंडी कांब रुळांत अडकून तुटली. हे अजस्र धूड रुळांवरून बाजूला काढण्यासाठी मध्य रेल्वेचे अनेक कर्मचारी सकाळपासून कार्यरत होते. हे काम करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना चार तास लागले.  त्यानंतर सकाळी १०च्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली. या बिघाडामुळे ६०हून अधिक सेवा रद्द करण्यात आल्या. परिणामी प्रवाशांना बस, रिक्षा आणि खासगी वाहने यांच्या आधारे प्रवास करावा लागला.
मध्य मार्गावर प्रवाशांचे आंदोलन
विद्याविहार रेल्वे स्थानकात असलेल्या अपुऱ्या प्रवासी सुविधांविरोधात सकाळी १०.५५च्या सुमारास पुकारण्यात आलेल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेचे धाबे दणाणले. दहा मिनिटे चाललेल्या या आंदोलनाद्वारे प्रवाशांनी असंतोष रेल्वेपर्यंत पोहोचवला. प्रवाशांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल , असे आश्वासन रेल्वेने दिले.  या आंदोलनामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नाही.
पश्चिम रेल्वेवरही दिरंगाई!
मुंबई शहर व उपनगरांत पडणाऱ्या पावसामुळे गुरुवारी सकाळपासूनच पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशिराने सुरू होती. विशेष म्हणजे या मार्गावर कुठेही पाणी भरले नसतानाही अनेक सेवा तब्बल १५ ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. संध्याकाळी पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीत सुधारणा झाली नाही. दरम्यान, संध्याकाळी दादर-डहाणू या शटल गाडीतील मिनेश नहर हा २६ वर्षीय तरुण वांद्रे स्थानकात प्लॅटफॉर्म आणि गाडी यांच्यातील पोकळीत अडकला. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यानंतर मिनेशला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले. परिणामी वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक चारचा मार्ग पूर्ण बंद होता. अखेर एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर प्लॅटफॉर्मचा काही भाग कापून मिनेशला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मिनेशला उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल केले. या गोंधळामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने सुरू होती.