ऑगस्टमध्ये अ‍ॅपवर सेवा सुरू होणार

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणाऱ्या मुंबई मेट्रोचे तिकीट काढणे आता आणखी सोपे होणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रा. लि.ने देशातील पहिल्या मेट्रो मोबाइल तिकिटिंग ‘ऑन गो’ या सेवेचे अनावरण केले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार असून ग्राहकांना त्यांच्या घरातून, कार्यालयातून, लोकलमधून कोठूनही मेट्रोचे तिकीट काढता येणार आहे.

मेट्रोच्या प्रवशांचा वेळ तिकिटासाठी जाऊ नये म्हणून मेट्रो स्थानकांवर तिकिट खिडक्यांबरोबरच स्वयंचलित टोकन देणारी यंत्रेही उपलब्ध करण्यात आली आहेत. तसे स्मार्टकार्डची सेवाही देण्यात आली आहे. यामध्ये आता मोबाइल तिकिटांची भर पडणार आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यात मोबाइल तिकीट सेवा सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या सध्याच्या मोबाइल अ‍ॅपमध्ये तिकीट खरेदी करण्यासाठी एक लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. या लिंकच्या माध्यमातून ग्राहक तिकीट नोंदणी करता येणाऱ्या अ‍ॅपवर पोहोचतो. तेथे ग्राहकाने त्याच्या प्रवासाचा मार्ग निश्चित केला की किती रुपये लागतील याची माहिती दर्शविली जाते. ग्राहकाने तेथील मोबाइल पाकिटामधील पैसे भरले की त्याच्या तिकिटाची खरेदी पूर्ण होते. ही खरेदी पूर्ण झाल्यावर ग्राहकाच्या मोबाइलवर एक ‘क्यूआर कोड’ येतो. हा क्यूआर कोड मेट्रोच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात येणाऱ्या क्यूआर कोड स्कॅनरवर ठेवल्यास प्रवेशद्वार उघडते. यानंतर प्रवास संपल्यावर स्थानकातून बाहेर पडण्यासाठी पुन्हा मोबाइलमधील क्यूआर कोड प्रवेशद्वारावरील स्कॅनरवर ठेवल्यास बाहेर जाण्याचा मार्ग खुला होईल. अशा प्रकारची सेवा देणारी मुंबई मेट्रो ही पहिली कंपनी ठरणार असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचा प्रवास अधिक सुकर व सुलभ करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचेही प्रवक्त्यांनी सांगितले. अ‍ॅपआधारित तिकिटाची खरेदी करण्यासाठी मोबाइल वॉलेट कंपनीशी बोलणे सुरू असून ते निश्चित केले जाईल. त्यानंतर ऑगस्टच्या तिसऱ्या आठवडय़ाच्या सुमारास ही सेवा सुरू केली जाईल असेही प्रवक्त्यांनी सांगितले.

अ‍ॅपमध्ये काय आहे?

  • प्रवाशाला हे अ‍ॅपआधारित तिकीट कोणत्याही ठिकाणाहून खरेदी करता येऊ शकते. यासाठी त्याला मेट्रो स्थानकाच्या परिसरात येऊनच तिकीट खरेदी करावी लागेल, असे बंधन असणार नाही.
  • या अ‍ॅपमध्ये सात दिवसापर्यंतचे तिकीट खरेदी करता येऊ शकते.
  • तिकीट खरेदी मोबाइलमधील सिम कार्डशी जोडलेली असणार आहे. यामुळे आपण हॅण्डसेट बदलला तरी क्यूआर कोड कायम राहू शकणार आहे.
  • प्रवासी एका वेळी सहा तिकिटांची खरेदी करू शकतो. ही खरेदी केल्यावर मोबाइलवर सहा क्यूआर कोड तयार होतील.
  • या अ‍ॅपमध्ये एक मार्ग, दुहेरी मार्ग, ट्रिप पास, स्टोअर व्हॅल्यू पासही उपलब्ध होणार आहेत.
  • प्रवाशाने घाटकोपर ते अंधेरी या मार्गासाठी तिकीट खरेदी केले व त्यानंतर त्याला वर्सोवाला उतरायचे असेल तर मेट्रोमध्ये प्रवास करीत असतानाच तो पुढचे तिकीट खरेदी करू शकतो.
  • याचबरोबर प्रवाशाने घाटकोपर ते अंधेरी या मार्गासाठी तिकीट खरेदी केले व त्यानंतर तो वर्सोवाला उतरला तर बाहेर जाण्याचे द्वार उघडणार नाही. यासाठी त्याला पुढील प्रवासाचे पैसे भरावे लागतील.
  • हा नियम दोन तासांपेक्षा जास्त वेळ मेट्रो स्थानकात राहिल्यानंतर बाहेर पडणाऱ्या प्रवाशांनाही लागू राहणार आहे. त्यांनाही अतिरिक्त पैसे भरल्याशिवाय बाहेर पडता येणार नाही.