मालवणी दारूकांडानंतर गावठी दारूच्या व्यवहारातील एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. पोलिसांनी गेल्या सहा दिवसांत ४२ जणांना अटक करून १५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यात ३३ दारूविक्रेत्या या महिला आहेत. ‘आंटी’ आणि ‘भाभी’ नावाने त्या या व्यवसाय करत होत्या.
या घटनेनंतर परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांनी पोलिसांचे पथक स्थापन करून दारूचे अड्डे उद्ध्वस्त करायला सुरुवात केली.  स्थानिक महिलांना ‘गुप्तहेर’ बनवून या कामी लावले. दारूविक्रेत्यांना गजाआड करत असताना त्यात सर्वाधिक दारूविक्रेते महिला असल्याचे समोर आले. गुन्हे आणि अटकसत्राच्या कारवाईत  २६ दारूविक्रेत्या या महिला होत्या. याशिवाय १५ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती त्यातही ७ महिला होत्या. म्हणजे ३३ महिला या दारू विक्रीच्या धंद्यात होत्या. परिसरात त्या ‘आंटी’ आणि ‘भाभी’ नावाने प्रसिद्ध होत्या. आम्ही ज्या महिलांना गुप्तहेर बनवून कामाला लावले आहे त्यांच्याकडून या दारूविक्रेत्या महिलांबाबतची गुप्त माहिती मिळतेय. ज्या दारूविक्रेत्यांकडे दारू सापडली नाही किंवा ज्यांनी पोलीस पोहोचण्याआधी नष्ट केली त्यांच्यावर कलम १५१ (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, असे विक्रम देशमाने यांनी सांगितले. महिलांचा दारू विक्रीतील सहभाग हा चिंता व्यक्त करणारा आहे. ३०० पोलीस कर्मचारी आणि ८० पोलीस अधिकारी हे दारूअड्डे उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेवर तैनात करण्यात आले आहेत.
ठाणे जिल्ह्य़ात ५० हून अधिक गुन्हे
ठाणे : ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि डायघर पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये देसाई गावाच्या खाडीपात्रातून ३ पिंपे दारू आणि ६८ पिंपे वॉश हे दारू बनवण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन ठाणे पोलिसांनी हस्तगत केले. याबरोबरच जिल्ह्य़ातील विविध भागांमध्ये ठाणे पोलिसांनी २५ हून अधिक ठिकाणी धाडी टाकून गावठी दारू जप्त केली. या प्रकरणी ५० हून अधिक गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.
यासोबत २ ट्रक काळा गूळ, ३५ लिटरहून अधिक दारू दिवा भागातून जप्त केली. जिल्ह्य़ात सुरू केलेल्या कारवाईमध्ये दहा ठिकाणी दारूनिर्मिती सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये कापूरबावडी, कासारवडवली, कोनगाव, भिवंडी या भागांत वेगवेगळ्या ठिकाणी घातलेल्या धाडीमध्ये ठाणे पोलिसांनी सुमारे २०० लिटर दारू जप्त केली असून १० जणांना अटक केली आहे. त्यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे, अशी माहिती मणेरे यांनी दिली.