तुमच्या परिसरात कुठेही अनैतिक धंदे, बेकायदेशीर कृत्य सुरू असेल तर पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. फक्त त्याचे छायाचित्र काढा आणि व्हॉटसअ‍ॅप हेल्पलाईनवर पाठवा. मुंबई पोलिसांनी पूर्व प्रादेशिक विभागात ही खास व्हॉटसअ‍ॅप हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. विशेष म्हणजे तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्याची व्यवस्था त्यात करण्यात आली आहे.  मुंबईत  झोपडपट्टय़ांमध्ये जुगार, अमली पदार्थ आणि बेकायदेशीर दारू विक्रीचे धंदे सुरू असतात. स्थानिक रहिवाशांना त्याची माहिती असते. परंतु पोलिसांकडे तक्रार केली तर नाव उघड होण्याची भीती असते. त्यासाठी पूर्व प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी व्हॉटसअ‍ॅप हेल्पलाईनची संकल्पना मांडली आणि परिमंडळ ६ आणि ७ मध्ये ती सुरू करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी सांगितले की, जे नागरिक या हेल्पलाईनवर तक्रारीचा मेसेज पाठवतील तो या नियंत्रण कक्षात जाईल. तेथून तो दोन्ही उपायुक्त आणि संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पाठविला जाईल. यामुळे पाठविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे. आठवडाभरात या हेल्पलाईनवर तक्रारी येण्यास सुरवात झाली असून त्यावर कारवाई सुरू झाल्याचेही राठोड यांनी सांगितले. पूर्व प्रादेशिक परिमंडळात चेंबूर, टिळकनगर, घाटकोपर, पंतनगर, विक्रोळी, पार्कसाईट, कांजूर मार्ग, गोवंडी, मुलुंड, नवघर, चुनाभट्टी, गोवंडी, ट्रॉम्बे, मानखुर्द, आरसीएफ, देवनार, भांडुप, शिवाजीनगर ही १८ पोलीस ठाणी असून त्यात ही हेल्पलाईन सुरू झालेली आहे. ७०४५७५७२७२ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.