इतर उपनगरांमधील हवा समाधानकारक
देवनार कचराभूमीतील आग विझून काही दिवस उलटल्यावर शहरातील प्रदूषणाची पातळी खाली आली असली तरी रविवारसारख्या सुट्टीच्या दिवशीही अंधेरी, वांद्रे-कुर्ला संकुल अशी व्यावसायिक ठिकाणे धुमसतानाच दिसत आहेत. या दोन्ही उपनगरांतील सूक्ष्म कणांच्या प्रदूषकांची संख्या संरक्षित पातळीपेक्षा तिपटीने अधिक आहे.
आगीमुळे निर्माण झालेल्या धुराने चेंबूर, गोवंडीसह पश्चिम उपनगरे तसेच नवी मुंबईची हवाही प्रदूषित केली होती. याचदरम्यान वाऱ्यांचा वेगही कमी असल्याने मुंबईची हवा स्वच्छ होण्यासाठी आठवडय़ाहून अधिक वेळ लागला. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी वाहतूक तसेच बांधकामांसारखे इतर उद्योगही काहीसे संथ असल्याने बहुतांश उपनगरांमधील हवा श्वास घेण्यायोग्य होती. अपवाद होता तो अंधेरी व वांद्रे-कुर्ला संकुलाचा. उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दोन्ही उपनगरांमध्ये सूक्ष्म धूलिकणांची पातळी रविवारीही ३००हून अधिक राहिली. ही पातळी १००हून खाली असणे अपेक्षित आहे. बोरिवली आणि माझगावमध्येही धूलिकणांची संख्या जास्त होती.
मुंबईची हवा डिसेंबरपासून सातत्याने खराब असल्याचे सफर प्रकल्पाअंतर्गत लावलेल्या प्रदूषण मापन यंत्रणेतून समोर येत आहे. दिल्लीच्या प्रदूषणाबाबत सम-विषम वाहनांचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र मुंबईतील प्रदूषणाबाबत मुंबईकरांना केवळ वाऱ्यांच्या नैसर्गिक यंत्रणेवरच अवलंबून राहायला लागत आहे.

मैदानाचे आज लोकार्पण
मुंबई : नायगाव येथील आठ एकर जमिनीवरील मैदानाचे सोमवारी लोकार्पण होत आहे. हे मैदान शहरातील मोठय़ा मैदानांपैकी एक ठरले आहे. बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र संघर्ष स्मृती मनोरंजन मैदान असे नामकरण होत असलेल्या या मैदानात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा स्मृतिस्तंभ ठेवण्यात आला आहे.

Untitled-26