शनिवारी एकाच दिवशी १५ जणांचा मृत्यू

मुंबईकरांची जीवनवाहिनी प्रत्यक्षात मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा बनत असल्याची बाब गेल्या आठवडय़ात पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. गेल्या आठवडय़ात मुंबईच्या उपनगरीय रेल्वेमार्गावर ६६ जणांचा अपघाती मृत्यू झाला. यातील १५ मृत्यू शनिवारी एकाच दिवशी, तर १४ मृत्यू गुरुवारी झाले. त्यामुळे भावेश नकाते प्रकरणानंतर स्थापन झालेल्या खासदारांच्या समितीने सादर केलेल्या अहवालाचे पुढे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

डोंबिवली येथील भावेश नकाते हा तरुण प्रचंड गर्दी असलेल्या गाडीत आत शिरण्याच्या प्रयत्नात असताना त्याचा हात सुटून तो धावत्या गाडीतून खाली पडला. या अपघातात त्याचा मृत्यू झाल्यावर या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पश्चिम व मध्य या दोन्ही रेल्वेंवरील अपघात रोखण्यासाठी वेगवेगळ्या समितींची स्थापना केली. या समित्यांमध्ये दोन्ही रेल्वेंचे महाव्यवस्थापक, स्थानिक खासदार आणि रेल्वे प्रश्नांवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता. या समितीने रेल्वे अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजनाही सुचवल्या होत्या. समितीने आपला अहवाल दोन्ही रेल्वे प्रशासनांकडे आणि त्या रेल्वे प्रशासनांनी रेल्वे बोर्डाकडे सादर केला होता. हा अहवाल सादर होऊन काही महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरीही पश्चिम आणि मध्य या दोन्ही रेल्वेमार्गावरील अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी झालेले नाही. सहा महिन्यांच्या कालावधीवर नजर टाकायची तर गेल्या सहा महिन्यांत १,४७३ प्रवाशांचा बळी गेला आहे. म्हणजेच सरासरी दर दिवशी नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत. तर गेल्या आठवडाभरात पश्चिम आणि मध्य रेल्वेवर एकूण ६६ जण मृत्युमुखी पडले असून ५६ जण रेल्वे अपघातांत जखमी झाले आहेत. गेल्या आठवडय़ातील ६६ मृत्यूंपैकी निम्मे म्हणजे ३३ मृत्यू गेल्या तीन दिवसांत झाले आहेत.

रेल्वे प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहेच. मात्र प्रवाशांनीही रेल्वेरूळ ओलांडणे, गाडीच्या टपावरून प्रवास करणे टाळायला हवे. तसेच पूर्वी रेल्वेच्या प्रश्नांबाबत आक्रमक होणाऱ्या खासदारांनी निवडून आल्यावर रेल्वे प्रश्नांकडे म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही.

– उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटना