मंगळवार संध्याकाळपाठोपाठ बुधवारी पहाटेही खोळंबा; ओव्हरहेड वायरच्या कामासाठीचा ब्लॉक लांबला

मध्य रेल्वेमार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या बिघाडसत्रांना कंटाळलेल्या टिटवाळा येथील प्रवाशांच्या संतापाचा बुधवारी पहाटे उद्रेक झाला. मंगळवारी संध्याकाळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने थकूनभागून घरी पोहोचलेल्या टिटवाळावासीयांना बुधवारी सकाळीही या दिरंगाईचा सामना करावा लागला. रात्री ओव्हरहेड वायरच्या कामासाठी घेतलेला ब्लॉक तासभर लांबल्याने ठाणे-अंबरनाथ ही गाडी खोळंबली. त्यामुळे संतापलेले प्रवासी सकाळी सहाच्या सुमारास रुळांवर उतरले आणि त्यांनी तीन तास आंदोलन करत रेल्वे वाहतूक थांबवून ठेवली. अखेर टिटवाळ्याच्या स्थानक अधीक्षकांनी गाडय़ा वेळेवर धावतील, असे आश्वासन देत या आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसत आंदोलनावर पडदा टाकला. या आंदोलनामुळे तब्बल ३२ सेवा पूर्णपणे रद्द झाल्या, तर सकाळच्या वेळेत उत्तरेकडून येणाऱ्या अनेक लांबपल्ल्याच्या गाडय़ांनाही या आंदोलनाचा फटका बसला.

मध्य रेल्वेवर मंगळवारी संध्याकाळी उशिरा ठाणे-पारसिक यांदरम्यान डाऊन जलद मार्गावर रुळाला तडा गेला होता. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या जलद तसेच लांबपल्ल्याच्या गाडय़ांचे वेळापत्रक विस्कटले होते. परिणामी या गाडय़ा नियोजित वेळेपेक्षा दीड तास उशिराने पोहोचत होत्या. या गोंधळामुळे वैतागलेले टिटवाळावासी रात्री उशिराच आपापल्या घरी पोहोचले होते. या दरम्यान या भागात ओव्हरहेड वायरच्या कामासाठी पहाटे ३.३५ ते ४.४० या वेळेत ब्लॉक घेण्यात आला. हा ब्लॉक ४.४० ऐवजी आणखी तासभर लांबून ५.५६ वाजता संपला. या कालावधीत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागली.

परिणामी ठाण्याहून पहाटे ५.२५ला सुटणारी आसनगाव लोकल उशिराने सुटली. या कारणावरून टिटवाळा स्थानकात या गाडीसाठी खोळंबलेल्या प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि सकाळी सहाच्या सुमारास प्रवासी रुळांवर उतरले. हे आंदोलन तब्बल तीन तास चालू होते. अखेर टिटवाळा येथील स्टेशन अधीक्षकांनी प्रवाशांना यापुढे गाडय़ा वेळेवर धावतील, असे लेखी आश्वासन दिले. त्याचबरोबर गाडय़ांचा काही गोंधळ झाल्यास लांबपल्ल्याच्या गाडय़ांना टिटवाळा येथे थांबा देऊन प्रवाशांना त्या गाडय़ांमधून प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल, असेही या पत्रात नमूद करण्यात आले.

सर्वच गाडय़ांना फटका

आंदोलनामुळे खोळंबलेल्या लांबपल्ल्याच्या गाडय़ा सकाळी नऊनंतर एकामागोमाग एक कल्याणच्या पुढे उपनगरीय सेवेत आल्या. त्यामुळे कर्जत-कल्याण येथून सुटणाऱ्या जलद गाडय़ांना त्याचा फटका बसला. या मार्गावरील गाडय़ा दुपापर्यंत तब्बल तासभर उशिराने धावत होत्या. या आंदोलनामुळे ३२ फेऱ्या पूर्णपणे, तर १० फेऱ्या अंशत: रद्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे २२ फेऱ्यांना या आंदोलनाचा थेट फटका बसला.

दिवा, बदलापूर, टिटवाळा..

गेल्या दोन वर्षांमध्ये उपनगरीय रेल्वेमार्गावर प्रवाशांनी रेल्वेच्या बिघाडांविरोधात आक्रमक होत रेल्वेरोको आंदोलन करण्याची ही तिसरी वेळ आहे. जानेवारी २०१५मध्ये दिवा येथील प्रवाशांनी केलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते. या वेळी गाडय़ांची तोडफोडही झाली होती. त्यानंतर दोन-तीन महिन्यांपूर्वी एक गाडी दहा मिनिटे उशिराने आल्याने संतापलेल्या बदलापूरच्या प्रवाशांनी सहा तास रेल्वे वाहतूक थांबवून ठेवली होती. याप्रकरणी विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमिताभ ओझा यांची बदली करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी घेतला. पण त्यानंतरही मुंबईच्या उपनगरीय सेवेत काहीच सुधारणा झाली नसून आता बुधवारी टिटवाळा येथेही आंदोलन झाले. यापुढे उपनगरीय सेवेत सुधारणा न झाल्यास रेल्वेला भविष्यात अशा अनेक आंदोलनांना तोंड द्यावे लागणार आहे.