सकाळपासून सुरू असलेली पावसाची रिपरिप, रस्त्यांवरील खड्डे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचाही गणपती वाजतगाजत आणण्यासाठीचा शेवटचा शनिवार यामुळे मुंबईभर शनिवारी वाहतूक कोंडी झाली. यात भर म्हणजे मानखुर्द येथे शुक्रवारी पहाटे उड्डाणपुलावरून वस्तीवर कोसळलेला डंपर काढण्यासाठी दुपारी शीव-पनवेल वाहतूकच थांबवण्यात आल्याने नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबून कोंडीत वाढ झाली. चौथ्या शनिवारची सुटी, श्रावणातला शेवटच्या शनिवारनिमित्त भाविकांचा ओघ यानेही रस्तोरस्ती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि मध्य मुंबईतच वाहतूक साकळल्याने मुंबईचा प्रवाहीपणा लोपला.

मुंबई आणि आसपासच्या परिसरात शुक्रवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत होता. शनिवारी सकाळीही पावसाची रिपरिप सुरुच होती. त्यामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता घसरली होती.  पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच रस्त्यांची चाळण झाल्याने वाहतुकीची गती आणखी मंदावली होती.

मानखुर्द येथे उड्डाणपुलावरुन वस्तीवर कोसळलेला डंपर काढण्यासाठी दुपारी शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. त्यामुळे नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग थेट देवनापर्यंत आली होती. त्यामुळेही पूर्व उपनगरांत वाहतूक कोंडी झाली होती.

उड्डाण नव्हे रेंगाळपूल! 

कांदिवलीच्या साईधाम भूमिगत मार्गात पाणी साचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करावा लागला. त्यातच ठाकूर कॉम्प्लेक्स येथील रस्ते खड्डेमय असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. परिणामी मागाठणे आणि ठाकूर कॉम्प्लेक्स उड्डाणपूल पार करण्यास किमान ३० मिनिटे लागत होती.

पायी हळू हळू चाला..

अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने अनेक मंडळे लालबाग परिसरातील गणेश कार्यशाळांमधून गणेशमूर्ती मंडपस्थळी घेऊन जात आहेत. त्यामुळे शनिवारी लालबाग, करी रोड परिसरातील वाहतूक अतिशय संथगतीने सुरू होती. रविवारी मोठय़ा मंडळांच्या मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

कोंडीमुक्त..

जेजे उड्डाणपूल, पूर्व मुक्तमार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू इथे वाहतूक सुरळीत.

खोळंबा..

खोदादाद सर्कल, छेडा नगर जंक्शन, एस. व्ही. रोड, विमानतळ रस्ता, मेट्रो ते पश्चिम द्रुतगती महामार्ग, मरोळ-मरोशी मार्ग, मरोळ नाका ते सिप्झ या मार्गावर खोळंबा.