‘बैल गेला आणि झोपा केला’
‘टीवायबीकॉम’सारख्या महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षा आटोपल्यानंतर कुठे कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ‘भरारी पथके’ नेमण्यास सुरुवात केली आहे. महत्त्वाच्या परीक्षा संपल्यानंतर भरारी पथके नेमण्याचा हा प्रकार ‘बैल गेला आणि झोपा केला’ म्हणून सध्या विद्यापीठ वर्तुळात विनोदाचा विषय ठरला आहे. खरे तर भरारी पथके नेमण्याचा प्रकार गेल्या वर्षी अचानक बंद करण्यात आला. त्या वेळी शेजारच्या महाविद्यालयातून ज्येष्ठ प्राध्यापकांना बोलावून त्यांची संबंधित महाविद्यालयात ‘जॉइंट चीफ कंडक्टर’ नेमून त्याच्या आधारे परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्याची नवी पद्धत विद्यापीठाने सुरू केली होती, परंतु यंदा ही पद्धत मोडीत काढून पुन्हा एकदा भरारी पथके पाठविण्याचे ठरले. परंतु परीक्षा सुरू होऊन महिना झाल्यानंतर त्याबद्दल प्राध्यापकांना कळविण्यात आल्याने त्याचा उपयोग काय, असा प्रश्न केला जातो आहे. वांद्रे ते अंधेरी, अंधेरी ते बोरिवली याप्रमाणे मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या भागातील महाविद्यालयांमध्ये परीक्षेदरम्यान भेटी देण्यासाठी म्हणून शिक्षकांची भरारी पथके नेमली जातात. या भरारी पथकांमधील प्राध्यापकांनी त्यांना नेमून दिलेल्या विभागातील वेगवेगळ्या महाविद्यालयांमधील परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे ती परीक्षा सुरू होण्याआधीच नेमणे आवश्यक आहेत, परंतु विद्यापीठाच्या विविध विषयांच्या परीक्षा ५ ऑक्टोबरला सुरू झाल्या तरी भरारी पथके नेमण्यात आली नव्हती. आता काही परीक्षा संपल्यानंतर कुठे शिक्षकांच्या हातात भरारी पथकांमध्ये नियुक्ती झाल्याची पत्रे पडू लागली आहेत. त्यात ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षांवर देखरेख ठेवण्यासाठी म्हणून तुमची नियुक्ती केल्याचा उल्लेख असल्याने ही पत्रे शिक्षकांमध्ये टवाळीचा विषय ठरली आहेत. कारण, कित्येक शिक्षकांच्या हातात बुधवार-गुरुवारकडे (३-४ नोव्हेंबरला) ही पत्रे पडली आहेत. टीवायबीकॉमसारखी मोठी परीक्षा आटोपल्यानंतर आपण परीक्षा केंद्रांना भेटी देऊन काय उपयोग, असा सवाल प्राध्यापक करू लागले आहेत.

आता काय उपयोग?
दरवर्षी साधारणपणे ८० ते ९० हजार इतकी विद्यार्थी संख्या असलेली टीवायबीकॉमची परीक्षा ही विद्यापीठाकरिता सर्वात मोठे आव्हान असते. टीवायबीकॉमच्या पाचव्या सत्राची परीक्षा ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवडय़ातच संपली. परंतु ही परीक्षा कुठल्याही देखरेखीशिवाय पार पडली. अनेक केंद्रांवर सर्रास कॉपीसारखे प्रकार सुरू होते, अशी तक्रार विद्यार्थी करीत आहेत. त्यामुळे हा प्रकार ‘बैल गेला आणि झोपा केला’ प्रकारचा ठरतो आहे. इतक्या उशिरा भरारी पथके नेमल्यानंतर त्याचा फायदा काय, असा सवाल एका प्राध्यापकांनी केला. तर विद्यापीठाच्या विविध परीक्षा जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याने निदान त्यांना तरी त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा आणखी एका प्राध्यापकांनी व्यक्त केली.