शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्यामुळे गेले कित्येक दिवस बंद असलेली तीन महाविद्यालये त्वरित सुरू करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढा, असे आदेश मुंबई विद्यापीठाने कर्जतच्या ‘सरस्वती एज्युकेशन सोसायटी’ला दिले आहेत.राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीची रक्कम न आल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देणे शक्य नाही. वेतन थकल्याने कर्मचाऱ्यांनी साखळी उपोषणाचा मार्ग पत्करला असून आपली अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि पॉलिटेक्निक ही तीन महाविद्यालये बंद करावी लागत आहेत, असे महाविद्यालयाने विद्यापीठाला ३० डिसेंबर, २०१४ रोजी कळविले होते. विद्यार्थ्यांचे झालेले नुकसानही संस्थेने जादा वर्ग घेऊन भरून काढावे, असे विद्यापीठाने संस्थेला पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.  विद्यापीठाच्या आदेशांचे पालन न केल्यास संस्थेला पुढील कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. खान यांनी स्पष्ट केले.