एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यासंदर्भातील प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय सीएसटी म्हणजेच ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ रेल्वे स्थानकाच्या नावात ‘महाराज’ हा शब्द टाकून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ करण्याचा प्रस्तावदेखील विधानसभेत मंजूर केला गेला आहे.

पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्यासाठीचा  प्रस्ताव शुक्रवारी विधानसभेत मांडण्यात आला. तर सीएसटी म्हणजेच छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाच्या नावात महाराज शब्दाची भर घातली जाण्याबद्दलचा प्रस्तावदेखील विधानसभेत सादर करण्यात आला. नव्या प्रस्तावामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे होणार आहे. या दोन्ही प्रस्तावांना विधान सभेची मंजूर मिळाली आहे. त्यामुळे आता हे प्रस्ताव राज्य सरकारतर्फे केंद्राला पाठवण्यात येणार आहेत.

सीएसटी रेल्वे स्थानकाचे बांधकाम १८८७ मध्ये पूर्ण झाले. त्यावेळी या रेल्वे स्थानकाला व्हिक्टोरिया टर्मिनस असे नाव देण्यात आले होते. व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या जयंतीनिमित्त या रेल्वे स्थानकाची निर्मिती करण्यात आली होती. सीएसटी मुंबईतील सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे. याच ठिकाणी मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे.

काही दिवसांपूर्वीच पश्चिम रेल्वेवरील जोगेश्वरी आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान उभारण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाला राम मंदिर नाव देण्यावरुन वाद झाला होता. तर यापूर्वी दादर रेल्वे स्थानकाचे नाव चैत्यभूमी करण्याची मागणी करण्यात आली होती.