मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेट यांचे नाव देण्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. दोस्ती एकर येथे बांधण्यात येणाऱ्या नाना शंकरशेट यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आणि अर्धपूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राज्यपालस सी विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
दोस्ती एकर येथे १ हजार ५०० चौरस मीटर जागेवर पालिकेने दिलेल्या जागेत नाना शंकरशेट यांचे स्मारक उभे राहत आहे. शंकरशेठ यांच्या १५० व्या पुण्यतिथीनिमित्त या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा सोमवार पार पडला. आपल्या भाषणाता शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाना शंकरशेट यांच्या कार्याचा गौरव केला. ते सर्व जाती धर्माचे होते.
मुंबईच्या विकासासाठी त्यांनी आपल्या कोटय़वधी रुपयांची संपत्ती दिली, असे ते म्हणाले. मुंबई सेंट्रल स्थानकाला नाना शंकरशेट यांचे नाव देण्याची बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करून हे नाव देऊ असेही ठाकरे म्हणाले. मुंबईत श्रीमंतांची संख्या खूप आहे. परंतु नानांसारखे दाते निर्माण होण्याची गरज राज्यपालांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.  शिवसेना नगरसेवक अ‍ॅड. मनमोहन चोणकर यांनी गेल्या काही वर्षांपासून नाना शंकरशेट यांच्या स्मारकाला जागा मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी जाणवत होती.