पश्चिम विभागीय मुख्यालयाचे प्रमुख व्हॉइस अ‍ॅडमिरल एस. पी. एस. चिमा यांना विश्वास

येत्या काही वर्षांत विविध प्रकारच्या विनाशिका आणि स्टेल्थ ब्रिगेड्स या वर्गातील स्वयंपूर्ण बनावटीच्या तब्बल ४७ युद्धनौका भारतीय नौदलात दाखल होत असून, त्यामुळे भारतीय नौदल हे जगातील सर्वोत्तम नौदलांपैकी एक ठरेल, असा विश्वास भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागीय मुख्यालयाचे प्रमुख व्हॉइस अ‍ॅडमिरल एस. पी. एस. चिमा यांनी व्यक्त केला.
१९७१ साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात भारतीय नौदलाने ३ व ४ डिसेंबरच्या मध्यरात्री गाजविलेल्या पराक्रमाची आठवण म्हणून प्रतिवर्षी ४ डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून, तर त्याआधीचा सप्ताह नौदल सप्ताह म्हणून साजरा होतो. यंदाच्या नौदल दिनाच्या निमित्ताने आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवर आयोजित पत्रकार परिषदेत व्हॉइस अ‍ॅडमिरल चिमा बोलत होते. भारतीय नौदलाने आता स्वयंपूर्ण बनावटीमध्ये विशेष प्रगती साध्य केली आहे असे सांगून ते म्हणाले, युद्धनौकांची ९० टक्के बनावट ही स्वयंपूर्णच असून विविध प्रकारचे सेन्सर्स व शस्त्रात्रे यांच्यामधील स्वयंपूर्णतेच्या प्रमाणातही सातत्याने वाढच होत आहे. भारत सरकारने अलीकडेच सुरू केलेल्या मेक इन इंडिया या मोहिमेमुळे आता या स्वयंपूर्णतेला बळकटी प्राप्त होणार आहे.
कोणत्याही देशाच्या समृद्धीसाठी व्यापार आणि व्यापारासाठी त्याला लाभणारे संरक्षण महत्त्वाची भूमिका बजावते. जगातील ९० टक्के व्यापार हा जलमार्गानेच होतो. भारताच्या बाबतीतही ते तेवढेच लागू आहे. त्यामुळेच भारतीय नौदल हे सक्षम आणि सामथ्र्यशाली असेल तरच आपल्या व्यापार-उदीमात भरभराट होऊ शकेल. हीच सामथ्र्यशाली नौदलाची भूमिका सध्या आपले नौदल बजावत आहे. त्यामुळेच एडनच्या आखातामध्ये गेल्या संपूर्ण वर्षांत सागरी चाच्यांच्या कारवायांना एकदाही यश आलेले नाही. भारतीय नौदलाने या पट्टय़ात तीन हजार व्यापारी नौकांना संरक्षण पुरवले असून सागरी चाच्यांचे ४६ हल्ले यशस्वीरीत्या परतवून लावले आहेत. यामुळेच भारताचे सुमारे २३ हजार कोटी रुपयांचे नुकसान वाचवण्यात यश आले आहे.

आयएनएस ‘सिंधुरक्षक’चा प्रश्न निकालात
सुमारे दोन वर्षांपूर्वी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस नौदल गोदीत स्फोट होऊन जलसमाधी मिळालेली आयएनएस सिंधुरक्षक ही पाणबुडी निकामी झाली असून, निकालात काढण्याचा प्रस्ताव मुख्यालयास पाठवण्यास आला आहे, अशी माहिती व्हॉइस अ‍ॅडमिरल चिमा यांनी दिली.

आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू युद्धनौकेवर नौदल सप्ताह साजरा करण्यात आला. (प्रशांत नाडकर)