कोणताही नवा प्रकल्प, नवीन योजना आधी पश्चिम रेल्वेवर अमलात आणून ती जुनी झाल्यावर मध्य रेल्वेकडे वळवण्यात येते, असा आरोप मध्य रेल्वेचे ४० लाख प्रवासी करतात. हा आरोप खरा असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात येणाऱ्या सर्वच्या सर्व ७२ नव्या गाडय़ा पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात जाणार असून मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या वाटय़ाला पश्चिम रेल्वेवर सध्या चालणाऱ्या १० वर्षे जुन्या सिमेन्स गाडय़ा येणार आहेत.
भारतातील पहिली रेल्वे मुंबई-ठाणे म्हणजेच सध्याच्या मध्य रेल्वेवर धावली असली, तरी स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई आणि दिल्ली यांना जोडणाऱ्या पश्चिम रेल्वेवर रेल्वे मंत्रालयाची कृपादृष्टी राहिलेली आहे. एटीव्हीएम यंत्रांपासून ते डीसी-एसी परिवर्तनापर्यंत सर्व महत्त्वाचे प्रकल्प आधी पश्चिम रेल्वेवर पूर्ण करून मग मध्य रेल्वेच्या वाटय़ाला येत असतात. याचे नवीन उदाहरण आता बंबार्डिअर गाडय़ांच्या निमित्ताने समोर आले आहे. मध्य रेल्वेवरील बहुतांश गाडय़ांचे आयुर्मान संपले आहे. मात्र नवीन गाडय़ा नसल्याने त्याच गाडय़ा रेटाव्या लागत आहेत. त्यामुळे अनेकदा गाडय़ांमध्ये बिघाड होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
आता मुंबईकरांना नव्या बंबार्डिअर गाडय़ांची आस लागली असताना या सर्वच्या सर्व नव्या गाडय़ा पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात जमा करण्यात येतील, असे खुद्द मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व पश्चिम रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनीच स्पष्ट केले. मध्य रेल्वेवर सिमेन्स, ‘भेल’ आणि रेट्रो फिटेड अशा तीन प्रकारच्या गाडय़ा चालतात. त्यात नव्या बंबार्डिअर कंपनीच्या गाडय़ांची भर पडल्यास मोटरमनसाठी गोंधळाची स्थिती होईल. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात या नव्या गाडय़ा जमा करून तेथे सध्या चालणाऱ्या सिमेन्स कंपनीच्या गाडय़ा मध्य रेल्वेवर चालवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
परिणामी, नव्या गाडय़ांच्या अपेक्षेने हुरळून गेलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांना या गाडय़ा पश्चिम रेल्वेवर जुन्या होण्याची वाट पाहावी लागणार आहे. मध्य रेल्वेवरील महत्त्वाकांक्षी डीसी-एसी परिवर्तनाचा प्रकल्प पूर्ण झाला, तरीही या नव्या गाडय़ा मध्य रेल्वेवर येणार नाहीत.