मालेगाव स्फोटातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह हिला शिक्षा व्हावी असे वाटत असेल तर तिला वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्याबाबत विचार करावा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिली होती. मात्र आरोग्याच्या पाश्र्वभूमीवर साध्वीला जामीन देण्यास आपला विरोध असल्याचे ‘एनआयए’तर्फे मंगळवारी न्यायालयाला कळविण्यात आले.
साध्वीला कर्करोग झाल्याचे निदान गेल्या वर्षी झाले असून त्याच कारणास्तव उपचारासाठी आपल्याला जामीन देण्याची विनंती तिने केली आहे. त्यावर तिला मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची तयारी ‘एनआयए’ने दाखवली होती. परंतु ती अमान्य करीत जामीन दिला नाही तर उपचारच करून घेणार नाही, असा इशाराही प्रज्ञा सिंहने दिला होता. त्यानंतर तिच्या विनंतीबाबत विचार करण्याची सूचना न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांनी केली होती. तसेच त्याबाबत उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. मंगळवारच्या सुनावणीत साध्वीला आरोग्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन देण्यास आपला विरोध असल्याचे ‘एनआयए’तर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने साध्वीच्या जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी १३ फेब्रुवारी रोजी ठेवली.