आवाजामुळे होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाची कल्पना असतानाही उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश धुडकावून लावत आयोजकांनी लावलेल्या डीजेंमुळे दणदणाटात वाढच झाल्याचे आढळून आले. डीजेंच्या दणदणाटामुळे शहरातील दहीहंडी महोत्सवात आवाजाने १०० डेसिबलची पातळी ओलांडली. ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी शहरातील विविध ठिकाणी आदल्या दिवशी व दहीहंडीच्या दिवशी आवाजाची पातळी मोजली. महोत्सवावेळी आवाजाची पातळी सरासरी २० डेसिबलने वाढल्याचे त्यातून निदर्शनास आले.

ध्वनिप्रदूषण नियमन कायद्यानुसार निवासी भागात ५५ डेसिबल तर रुग्णालय, मंदिर, शाळा, न्यायालय असलेल्या शांतता परिसरात ५० डेसिबलची पातळी निश्चित करण्यात आली आहे. बांधकाम, वाहनांचे आवाज यामुळे शहरातील बहुतांश ठिकाणी आवाजाची सरासरी पातळी ५५ डेसिबलपेक्षा अधिक असते. दहीहंडी महोत्सवात कानठळ्या बसवणारे डीजे, वाद्यवृंद यांचा दिवसभर सुरू असलेल्या गोंगाटामुळे आवाजाची पातळी वाढते. उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवातील आवाजाच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र यावर्षीही न्यायालय व ध्वनिप्रदूषण नियमन कायद्याची पायमल्ली करत बहुतेक सर्व गोविंदा उत्सवाच्या ठिकाणी आवाजाची मर्यादा ओलांडली गेली.

  • काळाचौकी येथील अभ्युदयनगरात बुधवारी सरासरी ६० डेसिबल आवाज होता. मात्र शिवसेनेचे डीजे आणि मनसेचे ढोलपथक यामुळे आवाजाची पातळी गुरुवारी ८० डेसिबलपर्यंत पोहोचली होती.
  • गिरगावातील क्रांतीनगरमध्ये तर शिवसेनेच्या डीजेचा आवाज १०८ डेसिबलपर्यंत पोहोचला होता. याउलट मोठय़ा आयोजकांनी यावेळी दहीहंडीचा उत्सव आटोपता घेतल्याने काही भागात मात्र शांतता होती.
  • घाटकोपर येथील राम कदम यांच्या दरवर्षी दिवसभर सुरू असलेल्या दहीहंडीच्या जागी दुपारी एकनंतर शांतता होती. गेल्यावर्षी पर्यंत आमच्या भागात दिवसभर डीजेचा आवाज कानठळ्या बसवत होता. यावेळी मात्र दुपारी बारा वाजेपर्यंतच हंडीचा उत्सव होता. त्यावेळीही डीजे नसल्याने यंदाचा उत्सव कमी आवाजात पार पडला. दरवर्षी याच पद्धतीने उत्सव साजवा व्हावा, अशी इच्छा घाटकोपर येथील जितेद्र विश्वकर्मा यांनी व्यक्त केली.

डेसिबल पातळीत चौपट वाढ

  • आवाजाची पातळी डेसिबल परिमाणात मोजली जाते. हे परिमाण लॉगरिथमिक पद्धतीने काढले जाते.
  • त्यामुळे दहा डेसिबलच्या फरकात आवाज दहापट वाढलेला असतो तर तीव्रता दुप्पट झालेली असते.
  • म्हणजे एका टंकलेखन यंत्राचा आवाज हा ५० डेसिबलचा असेल तर दहा टंकलेखन यंत्रांचा एकत्रित आवाज ६० डेसिबल होतो आणि आवाजाची तीव्रता दुप्पट होते.
  • साध्या शब्दांत ५० डेसिबलपेक्षा ६० डेसिबलचा आवाज हा दुप्पट असतो. सरासरी २० डेसिबलचा फरक म्हणजे नेहमीच्या आवाजात चौपटीने वाढ.

Untitled-1