‘डर’ या सिनेमातील खलनायकाप्रमाणेच तरुणीला त्रास देणाऱ्या तरुण अभियंत्याला न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गुन्हे शाखेच्या सायबर कक्षाने सबळ तांत्रिक पुरावे सादर केले होते. अशा गुन्ह्य़ात शिक्षा होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.
एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीला २००९ मध्ये निनावी ई-मेल येत होते. अभियंता असलेल्या तरुणाला पीडित तरुणीची प्रत्येक हालचाल कळत असल्याचे तो तिला ई-मेलद्वारे सांगत होता. या प्रकाराने तरुणी भयभीत झाली आणि तिने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार, साहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर मोरे यांच्या पथकाने या प्रकरणी तपास सुरू केला. ई-मेलचा ‘आयपी अ‍ॅड्रेस’ शोधून काढला. ते वाशी आणि दिल्लीजवळील गुरगाव येथून येत होते. पोलिसांनी त्या कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती घेतली आणि योगेश प्रभू याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान योगेशच्या मेलवरील तरुणीशी संबंधित सर्व ई-मेल त्याने ‘डिलीट’ केले होते.
पथकाने योगेशचा लॅपटॉप न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवून आक्षेपार्ह मजकूर पुन्हा मिळवला. त्याच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले आणि न्यायालयात सादर केले. खटल्याच्या वेळी साक्षीदारही फितूर झाले होते; परंतु पोलिसांकडे असलेल्या भक्कम पुराव्यामुळे किल्ला न्यायालयातील अतिरिक्त मुख्य न्यायाधीशांनी योगेश प्रभूला भादंविच्या कलम ५०९ अन्वये एक महिना कारावास आणि पाच हजार दंड तसेच माहिती अधिकार कायदा कलम ६७ आणि ६७ (अ) अन्वये तीन महिन्यांचा कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
प्रेमभंगामुळे बदला
योगेश प्रभू याची या तरुणीबरोबर ‘ऑर्कुट’ या समाजमाध्यमावर ओळख झाली होती आणि पुढे प्रेमात रूपांतर झाले होते; परंतु योगेशनेच तिच्याशी लग्नास नकार दिल्याने तिच्याशी संबंध तोडले होते. त्यामुळे योगेशने हा मार्ग पत्करला होता, असे पोलिसांनी सांगितले.