जातिवाचक शिवीगाळ केल्याचा चतुर्थ श्रेणी कामगाराचा आरोप
जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्याविरुद्ध रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कामगाराने जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी डॉ. लहाने यांचा जबाब नोंदविण्यात येणार असून तपासाअंती पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
आपल्या विविध मागण्यांसाठी जे.जे. रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. डॉ. लहाने शुक्रवारी सकाळी ८.३५ ला रुग्णालयाच्या प्रवेशद्वार ६ जवळील बाह्यरुग्ण विभागाजवळून जात असताना आंदोलनकर्ते घोषणा देत होते. यावेळी डॉ. लहाने प्रचंड भडकले आणि त्यांनी आपल्याला जातिवाचक शिवीगाळ केली, असा आरोप सफाई कर्मचारी नरेश वाघेला याने केला आहे.
डॉ. लहाने यांनी वाघेला यास जातिवाचक शिवीगाळ केल्याचा दावा तेथे उपस्थित असलेल्या दोन-तीन साक्षीदारांनी केला असून डॉ. लहाने यांच्याविरुद्घ अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. रुग्णालयातील सीसी टीव्हीतील चित्रण पाहून, तसेच घटनास्थळी उपस्थित रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, बाह्यरुग्ण विभागाजवळून जात असताना आंदोलक घोषणाबाजी करीत होते. कामावर रुजू होऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकावत होते. नरेश वाघेला याला आपण कोणत्याही प्रकारची शिवीगाळ केलेली नाही, असे डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.