ठाणे शहरातील वेगवेगळ्या व्यवसाय आणि आस्थपनांकरिता लागणाऱ्या परवान्यांमध्ये अडसर ठरणारे ‘इन्स्पेक्टर राज’ संपवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून पालिकेने सर्व दाखले, परवाने आणि ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाइन पद्घतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विशिष्ट प्रकारची नवी संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) विकसित करण्यात येणार आहे.
नोंदणी, नवीन परवाने व मुदत संपलेल्या परवान्यांचे नूतनीकरण आणि त्यामध्ये येणारे अडथळे या नव्या पद्धतीमुळे दूर होतील, अशी महापालिकेला आशा आहे. जन्म-मृत्यूचे दाखले, व्यवसाय परवाने, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र, रुग्णालयाची नोंदणी, आस्थापनांची नोंदणी, असे अनेक दाखले आणि परवाने मिळविण्यासाठी नागरिकांना महापालिकेत खेटे घालावे लागतात. या विभागांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुजोरीमुळे नागरिक वैतागतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विभागांमधील ‘इन्स्पेक्टर राज’ संपविण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू केल्या आहेत. यातूनच सर्व दाखले, परवाने आणि ना हरकत प्रमाणपत्र ऑनलाइन पद्घतीने देण्याची संकल्पना पुढे आली.

महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकारी या नव्या प्रणालीकरिता अभ्यास करून त्यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव तयार करीत आहेत. हा प्रस्ताव लवकरच सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. या नव्या प्रणालीद्वारे जन्म-मृत्यूचे दाखले घरपोच पाठविण्याचा विचार महापालिका करीत आहे. या प्रक्रियेतील तांत्रिक अडथळे असल्याने ते कशाप्रकारे दूर करता येतील याचा विचारही महापालिका करीत आहे. या प्रणालीमध्ये अर्जदारांना सुरुवातीलाच तात्पुरत्या स्वरूपाचे दाखले मिळणार आहेत, मात्र त्यानंतर कागदपत्रे आणि अन्य बाबींच्या तपासणी महापालिका करणार असून त्यामध्ये माहिती खोटी आढळल्यास परवाने रद्द करण्यासोबत कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद करण्यात येणार आहे