नवोदित कलाकारांकडून अत्यल्प प्रतिसाद

नवोदित कलावंतांना आपल्या कलेचे प्रदर्शन मांडण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी शिवसेनाप्रणीत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या कल्पनेतून साकारलेला खुल्या कलादालनाचा प्रयोग कलावंतांकडून मिळणाऱ्या अत्यल्प प्रतिसादामुळे अवघ्या तीन महिन्यात फसला आहे. कलादालनाची ही जागा आता वाहने उभी करण्याकरिता वापरली जात आहे.

शनिवारी-रविवारी दक्षिण मुंबईत पर्यटनाकरिता येणाऱ्यांना चित्र, शिल्प, संगीत आदी विविध कलांचा आस्वाद घेता यावा आणि नवोदित कलाकारांनाही व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी काळाघोडा येथील के. दुभाष मार्गावर खुल्या कलादालनाचा प्रयोग करण्यात आला होता. हा मुंबईतील या प्रकारचा पहिलाच प्रयोग होता. मात्र, कलाकारांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याने अवघ्या तीन महिन्यांत खुल्या कलादालनाचा गाशा महापालिकेला गुंडाळावा लागला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या के. दुभाष मार्गावरील खुल्या कलादालनाचे २३ ऑक्टोबर, २०१६ रोजी आदित्य यांच्याच हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. या ठिकाणच्या पदपथावर कलाकारांनी आपल्या चित्रांचे, छायाचित्रांचे, संगीत, शिल्पकलेचे प्रदर्शन मांडावे, अशी ती कल्पना होती. रसिकांना कलेचा आस्वाद घेता यावा यासाठी रविवारी या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यासाठी वाहतूक विभागाकडून रीतसर परवानगीही घेण्यात आली होती, तरीही कलाकारांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.

कलाकारांना त्यांच्या कलेचे प्रदर्शन मांडण्याकरिता १५ फूट लांबी-रुंदीच्या २० चौकटी तयार करण्यात आल्या होत्या. एका चौकटीचे भाडे ४५० रुपये इतके होते. कलाकारांना पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाकडे ऑनलाइन अर्ज करून त्याकरिता नोंदणी करण्याची सोय करण्यात आली होती. मात्र, २३ ऑक्टोबरला सुरू झालेले हे खुले कलादालन पुढचे केवळ १२ रविवार सुरू राहिले.

कलादालनाच्या उद्घाटनाच्या दिवशी प्रसिद्ध कलाकार अरजन खंबाटा, सुनील पडवळ, प्रसाद नाईक आणि जतीन कंपनी या कलाकारांनी आपल्या कला या ठिकाणी सादर केल्या होत्या. त्यानंतर मात्र कलाकारांनी पाठ फिरवल्यामुळे तेथे पूर्ववत वाहनतळ सुरू झाला आहे.

उन्हाळ्यामुळे आम्ही कलादालन मार्चपासून बंद ठेवले आहे. कलादालनात कला सादर करण्याकरिता ज्या कला महाविद्यालयांशी बोलणे झाले होते, त्यांच्या सध्या परीक्षा सुरू आहेत, तर काहींना सुट्टय़ा पडल्या आहेत. परंतु, जूनच्या तिसऱ्या आठवडय़ापासून कलादालन पुन्हा सुरू करणार आहोत.

आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख

जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यांची कला इथल्या खुल्या दालनात सादर करावी यासाठी आम्ही प्रस्ताव दिला होता. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये काही कलाकारांनी आपली कला तेथे सादर करण्यास उत्सुकता दाखवली. मात्र त्यानंतर जागेचे भाडे व बाजूलाच असलेल्या आर्ट गॅलरी आदी कारणांमुळे त्यांनी तिकडे पाठ फिरवली. त्यानंतर महापालिका निवडणुका आल्यामुळे आम्हालाही यात फार लक्ष घालता आले नाही. त्यामुळे कलादालन बंद झाले. परंतु, आम्ही ते पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहोत.

किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ‘पालिका विभाग