कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच त्याची विल्हेवाट लावावी या उद्देशाने पालिकेने मुंबईमधील २० हजार चौरस मीटर चटई क्षेत्रफळापेक्षा अधिक भूखंडावर उभ्या असलेल्या गृहनिर्माण सोसायटय़ांना सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प उभारणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे आता मुंबईमधील मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ांना सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प उभारणे भाग पडणार आहे.

मुंबईमध्ये दररोज साधारण ९ हजार मेट्रिक टनाहून अधिक घनकचरा निर्माण होत आहे. लोकसंख्येबरोबर वाढत असलेल्या कचऱ्याचे प्रमाण पालिकेसाठी डोकेदुखी बनले आहे. त्यातच मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर पुनर्विकास, विकासकामे सुरू असल्याने राबिट (माती) निर्माण होत आहे. मुंबईमधील कचराभूमींची क्षमता संपुष्टात आली असून दररोज मोठय़ा प्रमाणावर निर्माण होणारा कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न पालिका प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे आता कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच त्याची विल्हेवाट लावण्याची कल्पना पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिका उपायुक्त, साहाय्यक आयुक्त यांच्या मासिक आढावा बैठकीत मांडली.

मुंबईमधील २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळावर उभ्या असलेल्या गृहनिर्माण सोसायटय़ांना सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्याचे आदेश अजोय मेहता यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. ज्या सोसायटय़ांमध्ये अद्याप सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आलेले नाहीत, तेथे ते तातडीने उभारण्याची सूचना संबंधितांना करावी. तसेच प्रकल्प उभारण्यात आले की नाही याची खातरजमा करण्याचे आदेश आयुक्तांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

सर्व मोठी हॉटेल्स, मॉल येथेही मोठय़ा प्रमाणावर कचरा निर्माण होते. तेथेही सेंद्रिय खतनिर्मितीचे प्रकल्प उभारण्याचे बंधन घालावे, असे आदेशही आयुक्तांनी सर्व साहाय्यक आयुक्तांना दिले.