शस्त्रांच्या धाकाने सात दरोडेखोरांकडून चेकमेट कंपनीत लूट
ठाण्यातील एका खासगी वित्त कंपनीमध्ये मंगळवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली असून त्यात दरोडेखोरांनी कंपनीतील पाच कोटी रुपयांची रोकड लुटून नेली. विशेष म्हणजे, दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून कंपनीतील सुरक्षारक्षकाकडे असलेल्या बंदुकीतील गोळी काढून घेतली. तसेच दरोडय़ाचा कोणताही पुरवा पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून चोरटय़ांनी कंपनीतील सीसीटीव्हीची डीव्हीआर मशीन चोरून नेल्याची बाब समोर आली आहे. या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी ठाणे पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून ही पथके दरोडेखोरांचा माग काढीत आहेत.
ठाणे येथील तीन हात नाका परिसरात असलेल्या हरदीप इमारतीमध्ये चेकमेट सर्व्हिस  प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. ही कंपनी वित्तसंकलन आणि वित्तपुरवठा करण्याचे काम करते. मॉल तसेच व्यापारी या कंपनीचे ग्राहक आहेत. या ग्राहकांकडून दररोज कंपनी पैसे गोळा करते आणि त्या ग्राहकांच्या संबंधित बँक खात्यात जमा करते. दिवस आणि रात्र अशा दोन शिफ्टमध्ये कंपनीतील काम सुरू असते. सोमवारी रात्री कंपनीमध्ये कर्मचारी नेहमीप्रमाणे काम करीत होते. दरम्यान पहाटेच्या सुमारास कंपनीमध्ये शिरलेल्या सात दरोडेखोरांनी सुरक्षारक्षक प्रकाश पवार याला शस्त्राचा धाक दाखविला आणि त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतील एक जिवंत काडतुस काढून घेतले. तसेच कंपनीतील कर्मचाऱ्यांनाही दरोडेखोरांनी रिव्हॉल्वहर आणि चाकू या शस्त्रांचा धाक दाखवून कंपनीतून पाच कोटी रुपयांची रोकड लुटली. या कंपनीत सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या दरोडय़ाचा कोणताही पुरावा हाती लागू नये म्हणून दरोडेखोरांनी कॅमेऱ्यांना जोडण्यात आलेले दोन डीव्हीआर चोरले. याशिवाय कंपनीतील पाच मोबाइलही दरोडेखोरांनी लंपास केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी स्वत: घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर या गुन्हय़ाचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आरोपींचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले.

* हे दरोडेखोर दोन वाहनांमधून आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हे सातही जण मध्यम व मजबूत बांध्याचे होते. तिघांनी चेहऱ्यावर माकड टोपी घातली होती तर एकाने चेहऱ्यावर रुमाल बांधलेला होता.
* या चौघांनी प्रत्यक्ष लूट केली. उर्वरित तिघांनी बाहेर पाळत ठेवली होती. ते सर्व जण हिंदी तसेच मराठी भाषेत बोलत होते.