पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांसाठी व पंचायत समितीच्या ११४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत एकाही पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले नाही. भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक २१ जागा जिंकल्या आहेत. भाजप-शिवसेना यांची निवडणूकपूर्व युती झाली नसली तरी एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत.
पालघर पंचायत समितीवर शिवसेनेने ३४ पैकी १९ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले आहे. तर भाजपने विक्रमगड या पंचायत समितीवर १० पैकी ६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले आहे. वसई पंचायत समितीवर बहुजन विकास आघाडीने आपला झेंडा फडकविला आहे. आघाडीने या ठिकाणी आठपैकी सहा जागा जिंकल्या आहेत.
पंचायत समितीमध्ये जव्हार, मोखाडा, तलासरी, वाडा, डहाणू या पाच तालुक्यांमध्ये एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.  पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व वाडय़ाचे रहिवासी नामदार विष्णू सावरा यांच्या वाडा तालुक्यात शिवसेनेने जिल्हा परिषदेच्या सहा जागांपैकी चार जागा जिंकून विष्णू सावरा यांना शिवसेनेने धक्का दिलेला आहे.
एकूण जागा ५७
*भाजप २१
*शिवसेना १५
*बहुजन विकास आघाडी १०
*माकप ५
*राष्ट्रवादी काँग्रेस ४
*काँग्रेस व अपक्ष प्रत्येकी १