पेव्हरब्लॉक उखडल्याने चालताना कसरत; सत्ताधारी शिवसेना, ‘किल्ले’दार मनसेचे साफ दुर्लक्ष
अवघ्या मुंबईचे केंद्र समजल्या जाणाऱ्या दादर परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याच्या तक्रारी समोर असतानाच आता येथील पदपथही खड्डय़ांत जाऊ लागल्याचे चित्र आहे. येथील सेनापती बापट मार्गावरील पदपथांवर बसवण्यात आलेले पेव्हरब्लॉक उखडून गेले असून त्याठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या पदपथांवरून मार्गक्रमण करताना पादचाऱ्यांना अक्षरश: ‘आटय़ापाटय़ा’ खेळल्यासारख्या उडय़ा मारत वाट धरावी लागत आहे. मात्र या साऱ्याकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही. शिवाय दादर आपले म्हणून मिरवणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला आणि गेल्या निवडणुकीत दादरमधील सर्व प्रभाग काबीज करणाऱ्या मनसेलादेखील याकडे लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही.
सेनापती बापट मार्ग हा दादरमधील मुख्य रस्त्यांपैकी एक. दादर रेल्वे स्थानकातून पश्चिमेला बाहेर पडल्यानंतर हा रस्ता सुरू होतो, तो थेट सेनापती बापट यांच्या पुतळ्यापर्यंत पसरला आहे. रस्त्यावरील समोरासमोरच्या पदपथांवर मार्च-एप्रिलच्या दरम्यान पेव्हरब्लॉक बसविण्यात आले. पेव्हरब्लॉक बसविताना पदपथाच्या बंदिस्तीसाठी कडेला बसविलेले मोठे दगड काढून त्याजागी सिमेंटचे ब्लॉक बसविण्याचा घाट कंत्राटदाराने घातला होता. मात्र सेनापती बापट मार्गावरील दुकानदारांनी आक्षेप घेतल्याने कंत्राटदाराला पदपथाच्या बंदिस्तीचे काढलेले दगड पुन्हा बसवावे लागले. पेव्हरब्लॉक बसविताना पदपथाची पातळी एकसमान राखणे गरजेचे होते. परंतु तसे न झाल्याने काही ठिकाणी पदपथ असमतोल बनला आहे.
एका विशिष्ट आकाराचे पेव्हरब्लॉक बसविताना ते एकमेकांमध्ये अकडवले जातात. त्यामुळे हे पेव्हरब्लॉक खिळखिळीत होत नाहीत. सेनापती बापट मार्गावर बसविण्यात आलेले पेव्हरब्लॉक आकाराने चौकोनी आहेत. लाद्यांप्रमाणेच ते बसविण्यात आले असून त्यांच्या सांध्यांमध्ये केवळ वाळूचा भरणा करण्यात आला आहे. जूनमध्ये पावसाला सुरुवात झाल्यानंतर हळूहळू पेव्हरब्लॉकच्या सांध्यांतून पाणी मुरू लागले आणि त्याखालील वाळू हळूहळू सरकू लागली. पेव्हरब्लॉकखाली सिमेंटचा अंश अतिशय कमी असल्याने वाळू खचली आणि पेव्हरब्लॉक डळमळीत होऊ लागले. आतापर्यंत कोसळलेल्या पावसामुळे सेनापती बापट मार्गावरील पदपथांची पूर्णच वाट लागली आहे.
चालताना पेव्हरब्लॉक दबला जाऊन पादचाऱ्यांचा पाय मुरगळण्याचे काही प्रकारही येथे घडले आहेत. तर डळमळीत पेव्हरब्लॉकवरून चालताना काही ज्येष्ठ नागरिक चालताना पडल्याचेही येथील दुकानदारांकडून सांगण्यात येते. पेव्हरब्लॉकखाली साचलेले पाणी त्यावरून चालताना पादचाऱ्यांच्या अंगावरही उडत आहे. डळमळणाऱ्या पेव्हरब्लॉकचा धोका लक्षात घेऊन पादचारी रस्त्यावरून चालणे पसंत करीत आहेत. मात्र त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे.
गेली अनेक वर्षे दादर हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र पालिकेच्या मागील निवडणुकीत मनसेने चारीमुंडय़ा चित करीत शिवसेनेचा हा बालेकिल्ला काबीज केला होता.
फेरीवाल्यांचा सुळसुळाट, पदपथांवरील अतिक्रमण यासह दादरमधील अन्य नागरी सुविधांमध्ये सुधारणा होईल, असे दादरमधील भाबडय़ा मतदारांना वाटले होते. परंतु आजघडीला दादरमधील परिस्थिती ‘जैसे थेच’ आहे. या दोन्ही पक्षांना सेनापती बापट मार्गावरील चालण्यायोग्य पदपथ नागरिकांना देता आलेला नाही.