शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जी याची पहिली पत्नी शबनम सिंग हीच या प्रकरणातील सीबीआयची ‘गोपनीय साक्षीदार’ असल्याचे उघड झाले आहे. पीटरला कुठलीही नीतिमूल्ये नाहीत आणि तो बाईलवेडा असल्याचा आरोप तिने तिच्या जबाबात दिला आहे.

या प्रकरणातील ‘गोपनीय साक्षीदारा’च्या जबाबाची प्रत उपलब्ध करून देण्याची विनंती पीटरने विशेष न्यायालयाकडे केली होती. परंतु सीबीआयने या साक्षीदाराच्या जबाबाची प्रत देण्यास स्पष्ट नकार दिला होता. शबनमचा जबाब आधीच नोंदवण्यात आला असून पीटर आणि अन्य आरोपींविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्याचा समावेश आहे. परंतु तिचा पुरवणी जबाब नोंदवण्यात आला असून त्याची प्रत पीटरला देण्यास सीबीआयने नकार दिला होता. या जबाबानुसार तिने पीटरवर कुठलेही नीतिमूल्ये नसलेला पुरुष असल्याचा आरोप केला आहे. तो सतत मुलींकडे आकर्षित व्हायचा, रात्रीच्या पाटर्य़ा करण्याची त्याला आवड होती आणि बऱ्याच स्त्रिया त्याच्या जीवनात होत्या. त्यामुळे आपण त्याच्याशी काडीमोड घेतल्याचे तिने जबाबात म्हटले आहे. शिवाय घटस्फोटानंतर पीटरने शीनाच्या हत्येची मुख्य सूत्रधार आणि तिची आई इंद्राणी हिच्याशी आपली ओळख करून दिली.

इंद्राणी ही मैत्रीण असून आपण तिच्याशी लग्न करणार असल्याचे त्या वेळी पीटरने आपल्याला सांगितल्याचा दावाही शबनमने जबाबात केला आहे. एवढेच नव्हे, तर आपण त्यांना शुभेच्छा देऊन पीटरला तू कधीच सुधारणार नसल्याचा टोला हाणाल्याचेही तिने म्हटले आहे.