पाकिस्तानची कोंडी करण्याची पंतप्रधानांची ग्वाही

उरीतील लष्करी तळावरील हल्ल्यात १८ जवान शहीद झाल्याच्या घटनेला आठवडा पूर्ण होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोळीकोड येथे प्रथमच जाहीर सभेत बोलताना पाकिस्तानवर शाब्दिक हल्ला चढविला. ‘‘१८ जवान शहीद झाल्याने संपूर्ण देशातील वातावरण शोकदग्ध आहे. या जवानांचे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही,’’ असे सांगतानाच मोदी यांनी भारत नेमके कोणते पाऊल उचलणार, ते मात्र सांगितले नाही. दहशतवादाविरोधात सरकारने लढावे यासाठी पाकिस्तानातील जनताच तेथील सरकारविरुद्ध उभी ठाकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

त्यांच्या भाषणात आधीच्याच मुद्दय़ांची पुनरूक्ती असली तरी संयमाची सीमारेषा  त्यांनी प्रयत्नपूर्वक ओलांडली नाही. उलट या भाषणात त्यांनी पाकिस्तानी जनतेशी भावनिक संवाद साधण्याचाच प्रयत्न केला.

उरीतील हल्ल्यानंतर मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला होताच. त्यानंतर लष्करप्रमुख जनरल सुहाग यांच्यासह त्यांच्या अनेक बैठका झाल्या. शनिवारी तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांनीही मोदी यांची भेट घेतली. उभय देशांत वाढत असलेल्या तणावाचे संयुक्त राष्ट्र आमसभेतही दर्शन घडले. भारतीय प्रतिनिधींनी प्रथमच जाहीरपणे पाकिस्तानचे नाव घेऊन दहशतवाद निर्यातदार देश म्हणून त्यांची संभावना केली होती. या पाश्र्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनात भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर सभेच्या निमित्ताने ते जाहीरपणे प्रथमच बोलत होते. त्यामुळे त्यांच्या या भाषणाकडे देशाचे विशेष लक्ष होते.

दहशतवाद्यांनी कान उघडून नीट ऐकावे आणि मी पाकिस्तानी नेतृत्वालाही सांगू इच्छितो की आमच्या जवानांचे वीरमरण आम्ही विसरणार नाही. दहशतवाद पसरविण्याची पाकिस्तानची कृत्ये उघडी पाडून जागतिक पातळीवर मुत्सद्दीपणे पाकिस्तानची कोंडी करण्याची एकही संधी सोडणार नाही, असे मोदी म्हणाले.

पाकिस्तानला काश्मीर हवे आहे. प्रत्यक्षात त्यांना त्यांनी बळकावलेल्या काश्मीरचा, गिलगीटचा आणि बलूचिस्तानचा विकास साधलेला नाही. मग त्यांना आणखी प्रांत कशाला हवा आहे, असा सवालही त्यांनी केला. आम्हाला आमच्या सेनादलांचा अभिमान आहे.

गेल्या काही महिन्यांत घुसखोरीचे १७ प्रयत्न सेनादलांनी हाणून पाडले आणि ११० घुसखोर अतिरेक्यांना कंठस्नान घातले, असे मोदी यांनी सांगितले. हे शतक आशियाचे असेल, एका देशाला मात्र हे शतक दहशतवादाचे असावेसे वाटते, असेही मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता सांगितले.

केरळ ही देवभूमी असल्याचा गौरव करीत येथे भाजप विस्तारासाठी धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांना जे अतोनात कष्ट आणि प्रतिकूलतेचा सामना करावा लागतो त्याची जाणीव ठेवली जाईल, असेही मोदी म्हणाले.

पाकिस्तानी जनतेसाठी ‘मन की बात’!

  • आम्ही युद्धासाठी तयार आहोत, तुम्हीही सज्ज व्हा.. पण ते युद्ध असेल गरिबी, निरक्षरता, बेरोजगारीविरोधात. त्यात कोण जिंकतो, ते पाहू!
  • १९४७च्या आधी तुम्हीही याच मातृभूमीला वंदन करीत होतात.
  • काश्मीरच्या नावावर तुमचे नेते तुमची दिशाभूल करीत आहेत. पण जो भूभाग त्यांच्या ताब्यात आहे त्याचीही त्यांना देखभाल करता येत नाही, हे लक्षात घ्या.
  • दोन्ही देश एकाचवेळी स्वतंत्र झाले, मग भारत सॉफ्टवेअरची आणि आपण दहशतवादाची निर्यात का करतो, असा प्रश्न तुमच्या राज्यकर्त्यांना विचारा.

अंबानी, अदानी ही काँग्रेसची भेट!

मोदी यांच्या भाषणाआधी भाजपचे दक्षिणेतील नेते व्यंकय्या नायडू यांचे भाषण झाले. या भाषणात त्यांनी ‘अदानी आणि अंबानी  ही काँग्रेसची मेहरबानी,’ असल्याची टीका केली. हे दोन्ही उद्योजक काँग्रेस राजवटीनेच जन्माला घातले, असे ते म्हणाले. मोदी यांच्या भाषणात मात्र या टीकेबद्दल कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही.

‘सिंधू’विषयक निर्णयाला काश्मीरचा पाठिंबा : निर्मलसिंह

सिंधू पाणीवाटप कराराने जम्मू-काश्मीरचे मोठे नुकसान झाले आहे. १९६०च्या त्या कराराबाबत केंद्र सरकार जो निर्णय घेईल, त्यास राज्याचा पूर्ण पाठिंबा असेल, असे जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मलसिंह यांनी शुक्रवारी सांगितले.  या कराराच्या पुनर्विचाराचे संकेत केंद्राने दिले आहेत.  निर्मलसिंह म्हणाले, या करारामुळे जम्मू-काश्मीरला विविध नद्यांच्या पाण्याचा, खासकरून जम्मूमधील चिनाबच्या पाण्याचा, शेती वा अन्य कारणांसाठी पूर्णत: वापर करता येत नाही. त्यामुळे राज्याची मोठी हानी झाली आहे.