मानखुर्द पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी एका आरोपीने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दिपक जाधव असे त्याचे नाव असून तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास दिपक जाधव याला मारामारी प्रकरणात चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते. काही वेळानंतर त्याला सोडून देण्यात आले. मात्र काही वेळातच पोलीस ठाण्याच्या दुसऱ्या मजल्यावरील २०५ क्रमांकाच्या खोलीत दिपक जाधव याचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळलाय्. ही खोली पोलीस अधिकाऱ्याची असून एक पोलीस अधिकारी खोलीत गणवेष बदलण्यासाठी गेला असता हा प्रकार दिसला.
पोलीस कर्मचाऱ्याची पॅंटीला गळफास लावून त्याने आत्महत्या केली होती. त्याने एकाएकी आत्महत्या केल्याने गूढ निर्माण झाले आहे. जाधव हा मनोरुग्ण असून रुग्णालयातून पळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे.