सायन-पनवेल मार्गावरून घरी परतत असणाऱ्या संतोष शिंदे या पोलिसाचा आठवड्याभरापूर्वी बाईक खड्ड्यात आदळल्याने अपघात झाला होता. खासगी रूग्णालयात उपचार घेत असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. विले-पार्ले पोलीस ठाण्यात काम करणारे संतोष शिंदे हे नवी मुंबईतील नेरूळमध्ये रहात होते.

आठवड्याभरापूर्वी आपले काम संपवून संतोष शिंदे हे आपल्या मोटरसायकलवरून पहाटे २ च्या सुमारास घरी परतत होते. त्याचवेळी सायन पनवेल मार्गावर वाशीच्या पुढे गेल्यावर  शिंदे यांची बाईक खड्ड्यात आदळली. एका मोठ्या खड्ड्यात शिंदे यांची गाडी आदळून त्यांचा अपघात झाला, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बरकाळे यांनी दिली.

रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा होता, अंधार असल्याने शिंदे यांना तो खड्डा दिसला नाही. अपघातानंतर त्यांना एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या अंगावर आणि डोक्याला बऱ्याच जखमा झाल्या होत्या. खड्ड्यात त्यांची गाडी इतक्या जोरात आदळली की डोक्यावर हेल्मेट असूनही ते गंभीर जखमी झाले, असेही बरकाळे यांनी सांगितले आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या बातमीनुसार या अपघाताची माहिती मिळताच बीट मार्शलची टीम वाशी पोलीस ठाण्यातून तातडीने अपघाताच्या ठिकाणी गेली. तिथून शिंदे यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शिंदे यांना अति दक्षता विभागातही दाखल करण्यात आले. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

‘सायन पनवेल टोलवेज प्रायव्हेट लिमिटेड’ विरोधात कलम ३३७, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आता शिंदे यांचा मृत्यू झाल्यानंतर आम्ही कलम ३०४ अन्वयेही गुन्हा दाखल केल्याचे बरकाळे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आमच्याकडून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचेही बरकाळे यांनी म्हटले आहे.