ऐन दिवाळीत बाजारात बनावट नोटा चलनात आणण्यासाठी गुन्हेगारी टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. गुन्हे शाखा ७ ने अशाच टोळीतील दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून ५ लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत.
बनावट नोटा घेऊन पूर्व द्रुतगती महामार्गावरील ऐरोली पुलाजवळ दोघेजण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तीन पथके या भागात तैनात ठेवली होती. संशयास्पद व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या मारूती गाडीतून येताच पोलीस पथकांनी त्यांना अटक केली. अली अहमद जीब्रिल शा (३५) आणि आरिफ साई (३२) अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून १००० रुपये आणि ५०० रुपये चलनीमूल्य असलेल्या एकूण ५ लाख रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत झाल्या. त्यांनी या नोटा कुठून आणल्या आणि त्यांच्या टोळीतील अन्य साथीदार कोण आहेत त्याचा तपास सुरू आहे. सणासुदीच्या काळात बनावट नोटा बाजारात खपवणे तुलनेने सोपे असते. त्यामुळे अशा बनावट नोटा या काळात अधिक प्रमाणात बाजारात आणल्या जातात, असे पोलिसांनी सांगितले.