बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कवरच व्हावे अशी मागणी शिवसेना नेते व माजी खासदार मनोहर जोशी यांनी लावून धरलेली असतानाच, महापौर निवासात बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचा नवा विचारही पुढे आला आहे. कोहिनूर मिलच्या परिसरात स्मारक उभारा, असेही सुचविण्यात आल्याने आता स्मारकाचा निर्णय उद्धव ठाकरे यानीच घ्यावा, असा मतप्रवाह सेनेत जोर धरू लागला आहे. बाळासाहेबांचे कुठे व कसे उभारावे याबाबत अनेक सूचना महापालिकेत येत असून याबाबतचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे हेच घेतील, असे महापौर सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले. यामुळे मनोहर जोशी यांनी मांडलेली भूमिका सेनेतच काहीजणांना मान्य नसल्याचे दिसून येत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यावरुन सध्या उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. शिवाजी पार्क, इंदू मिल, महापौर बंगला, कोहिनूर मिलची जागा आदी ठिकाणी शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याची मागणी विविध स्तरावरुन सुरू झाली आहे.
पालिका सभागृहातही विविध पक्षांच्या नगरसेवकांनी शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी जागा सुचविली आहे. तसेच काही ठिकाणांना त्यांचे नाव देण्याची मागणीही केली आहे. नगरसेवकांनी केलेल्या मागण्यांमुळे काँग्रेस आणि मनसेला खुलासा करण्याची वेळ आली. बाळासाहेबांच्या स्मारकाचे ‘राज’कारण करण्याचा प्रयत्न मनसेनेही करून पाहिला परंतु तो अंगाशी येणार असे दिसताच, ती आमच्या पक्षाची भूमिका नाही असा खुलासा मनसेला करावा लागला. त्यातच मनोहर जोशी यांनी ज्या तातडीने शिवाजी पार्क येथे स्मारक उभारण्याची मागणी केली, त्यामागे राजकारण असल्याची चर्चा सेनेच्या नगरसेवकांमध्ये होत आहे.
मनोहर जोशी यांचा विरोध डावलून सदा सरवणकर यांना शिवसेनेत घेऊन त्यांना विभागप्रमुखपद देण्यात आले. शिवाजी पार्क व दादरमधील नागरिकांचा तसेच क्रीडाप्रेमींचा विरोध असतानाही शिवाजी पार्कचा आग्रह रेटल्यास त्याचा फटका दादरमधील विधानसभा निवडणुकीत बसू शकतो याची जाणीव बाळगूनच हे ‘कोहिनूरी राजकारण’ खेळण्यात आल्याचे मत सेनेत व्यक्त होत आहे. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाबाबत पालिका सभागृहात नगरसेवकांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर या संदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्मारकासाठी सुचविण्यात आलेल्या जागांबाबतची माहिती ही समिती उद्धव ठाकरे यांना देणार आहे. त्यानंतरच ते या संदर्भात निर्णय घेतील, असे महापौर सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले. महापौर बंगल्यावर बाळासाहेबांचे  स्मारक उभारण्यासंदर्भातला कोणताही प्रस्ताव नसल्याचेही त्यांनी सांगितले.

निर्णय उद्धव ठाकरे यांच्यावरच सोपविला
बाळासाहेबांचे भव्य स्मारक उभारण्याएवढी जागा शिवाजी पार्कवर मिळणार नाही, हे स्पष्ट असल्यामुळे सेनेच्या पालिकेतील नगरसेवकांनी व महापौरांनी याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यावरच आता सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.