मुंबई महापालिकेकडून १० मेपर्यंत प्रवेश घेण्याच्या सूचना
‘बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्या’अंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये आर्थिक व सामाजिकदृष्टय़ा दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांकरिता राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशांकरिता पहिल्या फेरीत वाटप झालेल्या जागांवर दिलेल्या मुदतीत प्रवेश घेण्यात विद्यार्थ्यांना यश आलेले नाही. अनेक ठिकाणी शाळांनी दाखविलेल्या निरुत्साहामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात अडचणी आल्या आहेत. त्यामुळे, पहिल्या फेरीत प्रवेश घेण्याची मुदत १० मेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
आरटीईअंतर्गत राखीव असलेल्या मुंबईतील खासगी शाळांकरिता मुंबई महापालिका ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविते. पालिकेने नुकतीच याकरिता पहिली प्रवेश फेरी राबविली होती. परंतु, पालिकेने जागा वाटप केलेल्या ११ विद्यार्थ्यांना गोरेगावमधील एम. एन. इंग्लिश स्कूलने प्रवेश देण्यासच नकार दिला. गेले १५ दिवस शाळेने विद्यार्थ्यांना झुलविले होते. त्यामुळे, पालकांना पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी लागली, असे आरटीई कार्यकर्त्यां अविषा कुलकर्णी यांनी सांगितले. त्याचप्रमाणे ओशिवरातील एका शाळेने पालकांकडे प्रवेश निश्चित करण्याआधीच २०१७-१८चा उत्पन्नाचा दाखला देण्याचा आग्रह धरल्याने प्रवेशामध्ये अडचणी आल्या. तर रायगड मिलिटरी स्कूलने शिशुवर्गात प्रवेश देण्याऐवजी इयत्ता पहिलीत प्रवेश देऊ, असे सांगितल्याने पालकांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
शाळांकडून निर्माण झालेल्या अशा अडचणींमुळे अनेक पालकांमध्ये प्रवेशाबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र, मुदतवाढ मिळाल्यामुळे आता प्रवेशासाठी पालकांचा प्रयत्न असेल.

१३०० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित
विविध अडचणींमुळे अनेक शाळांमध्ये पहिल्या प्रवेश फेरीत जागांचे वाटप होऊनही पालकांना प्रवेश घेता आलेले नाहीत. म्हणून सामाजिक कार्यकर्ते आणि पालक यांच्या मागणीनुसार पालिकेने प्रवेशाची मुदत १० मेपर्यंत वाढविली आहे. शाळांकडून उभ्या करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे पालिकेने पहिल्या फेरीत जागा वाटप केलेल्या ३४११ विद्यार्थ्यांपैकी केवळ १३०० विद्यार्थ्यांनाच शनिवारी ११ वाजेपर्यंत आपले प्रवेश निश्चित करता आले होते.