पश्चिम रेल्वेला फटका

धावत्या लोकलमध्ये अश्लील चित्रफीत पाहण्याचा एका गार्डचा प्रकार सर्वच गार्डच्या अंगलट आला आहे. कारण आणीबाणीच्या प्रसंगी सूचना देण्यासाठी म्हणून गार्डला मोबाइल फोन वापरण्याची मुभा दिली जात होती. परंतु आता सर्वच गार्डना धावत्या गाडीत मोबाइल फोन वापरण्यास मज्जाव करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. अर्थात यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी म्हणून रेल्वेला अंतर्गत ‘रेडिओ संपर्क यंत्रणा’ गार्डच्या डब्यात बसवावी लागणार असून त्यासाठी सहा कोटी रुपयांचा भरुदड सहन करावा लागणार आहे.
गेल्या मंगळवारी पश्चिम रेल्वेचा एक गार्ड धावत्या लोकलमध्ये भ्रमणध्वनीवर अश्लील चित्रफीत पाहत असताना त्या चित्रफितीतील ‘मदभरे’ आवाज रेल्वेच्या उद्घोषणेमुळे गाडीतील प्रवाशांना ऐकावे लागले होते. या घटनेनंतर अडचणीत आलेल्या रेल्वे प्रशासनाने तब्बल सहा कोटी रुपये खर्च करून ‘रेडियो संपर्क यंत्रणा’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या यंत्रणेनंतर प्रशासनाला गार्डवर मोटारमन कक्षात भ्रमणध्वनी नेण्यास बंदी घालता येईल.
सध्या धावत्या गाडीत गार्डकडे उद्घोषणा करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रवाशांना येणाऱ्या प्रत्येक स्थानकांची पूर्वकल्पना देण्याची जबाबदारी गार्डची असते. याशिवाय आणीबाणीच्या प्रसंगी नियंत्रण कक्षाला संपर्क करण्यासाठी असणारी यंत्रणा बिघडल्यास केवळ सुरक्षितता म्हणून गार्डला मोटारमन कक्षात भ्रमणध्वनी नेण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र गेल्या मंगळवारी गार्डच्या ‘त्या’ प्रकरणानंतर रेल्वे प्रशासन अडचणीत आले आहे. त्यामुळे गार्डच्या कक्षात नव्याने रेडियो संपर्क यंत्रणा बसवण्याचा निर्णय रेल्वेने घेऊन टाकला आहे.

रेडियो संपर्क यंत्रणा हाय रेडियो फ्रीक्वेन्सी तत्त्वावर काम करणार आहे. त्यासाठी महालक्ष्मी स्थानकात पहिला टॉवर उभारण्यात येणार आहे. त्यानंतर पुढे काही किलोमीटर अंतरावर काही टॉवर बसवण्यात येणार आहे. या यंत्रणेद्वारे एखादा अपघात झाल्यास, गाडी रुळावरून घसरल्यास किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची माहिती देता येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी सांगितले.