देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आयात आणि निर्यात यांमध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या बंदरांना रेल्वेमार्गाद्वारे देशाशी जोडण्याचा प्रयत्न रेल्वे मंत्रालय करत असले, तरी गुजरामधील एक बंदर सध्या प्रचंड पावसामुळे आणि पुरामुळे देशापासून तुटले आहे. देशाच्या निर्यात प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिपावाव बंदर परिसरात प्रचंड पाऊस पडल्याने या परिसरातील धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे या बंदराला भावनगरसह इतर देशाशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गापैकी तब्बल दीड किलोमीटरचा मार्ग वाहून गेला आहे. त्यामुळे या बंदरातून होणारी आयात-निर्यात बंद पडली आहे. या भागात धावणाऱ्या पश्चिम रेल्वेला यामुळे दर दिवशी पाच कोटींचे नुकसान सोसावे लागत आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे गेल्या आठवडय़ात गुजरात व मुंबई परिसरात मुसळधार पाऊस पडला. या पावसाने गुजरातच्या भावनगर परिसरातील अनेक धरणे, बंधारे भरले होते. परिणामी पिपावाव बंदराजवळील जिरारोड येथील धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. हे दरवाजे उघडण्याआधी गावकऱ्यांना वा रेल्वे प्रशासनाला काहीही कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे भेंसवाडी-जिरारोड या दोन स्थानकांदरम्यानच्या पाच किलोमीटर रेल्वे रूळांपैकी दीड किलोमीटर रूळ वाहून गेले.
पिपावाव हे बंदर गुजरातमधील प्रमुख बंदर मानले जाते. या बंदरात दर दिवशी किमान दोन ते तीन जहाजे दाखल होतात. त्यातून उतरणारा माल देशभरात पोहोचवण्यासाठी आणि देशभरातून या बंदरात माल आणण्यासाठी दर दिवशी १४ मालगाडय़ा या बंदरापर्यंत चालवल्या जातात. मात्र गेल्या आठवडय़ापासून रेल्वेरूळ वाहून गेल्याने या सर्व मालगाडय़ांची वाहतूक बंद आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य परिचालन व्यवस्थापक अरविंदकुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. या बंदरात उतरणारी जहाजे जेएनपीटीकडे वळवली जाऊ शकतात. मात्र जेएनपीटीकडे एवढय़ा जहाजांसाठीची क्षमता नसल्याने नुकसान होत आहे, असेही स्पष्ट केले.