अखेपर्यंत काँग्रेस पक्षातच राहण्याची घोषणा करून मुख्यमंत्र्यांवर जाहीर शरसंधान साधलेले पनवेलचे माजी आमदार प्रशांत ठाकूर यांनी अखेर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना फुलांचा आहेर देऊन भेट घेतली. यामुळे ठाकूर यांनी भाजपप्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. लवकरच हा पक्षप्रवेश होणार असल्याचे समजते. यामुळे पनवेलच्या ठाकूर समर्थक आणि भाजपच्या गोटामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मात्र त्याच वेळी पनवेल परिसरातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
ठाकूर यांनी खारघर येथे नव्याने होणाऱ्या टोलच्या मुद्दय़ावर पनवेलच्या मतदारांची सहानुभूती मिळविण्यासाठी हा राजीनामा दिल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र ठाकूर यांच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर यापुढे भाजपचे कमळ फुललेले पाहायला मिळणार आहे. प्रशांत ठाकूर यांनी जेएनपीटी येथील विकासकामे तसेच विमानतळाची विकासकामे आपल्या वाटय़ाला राहण्यासाठी आणि महायुती सत्तेमध्ये आल्यावर मंत्रिपद पदरात पडण्यासाठी ही राजकीय खेळी खेळल्याचा प्रचार विरोधकांकडून होत आहे.