पालकांची सरकारकडे धाव; समान शुल्क आकारण्याचा आग्रह

राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आकारण्यात येत असलेल्या भरमसाट शुल्क वाढीविरोधात पालकांनी आवाज उठवला आहे. राज्यात सर्व महाविद्यालयांमध्ये समान शिक्षण शुल्क का घेण्यात येत नाही, याबाबत सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी पालकांनी केली आहे. सोमवारी पुन्हा एकदा नीटविरोधात मत व्यक्त करताना नीट ही विद्यार्थ्यांसाठी तोटय़ाची असल्याचे मत पालकांनी व्यक्त केले.

राज्यातील खासगी वैद्यकीय आणि अभिमत विद्यापीठांकडून अद्याप त्यांच्या संकेतस्थळावर शुल्क जाहीर न केल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रवेशाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सोमवारी पालकांनी मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आपला विरोध दर्शविताना त्यांनी खासगी कॉलेजांमध्येही समान शुल्क ठेवण्याची मागणी केली आहे. तर यावेळी राज्य वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या कामकाजाविरोधात नाराजी व्यक्त केली. यावेळी पालक, विद्यार्थी आणि मनविसेचे सुधाकर तांबोळी आणि अखिल चित्रे उपस्थित होते.

केंद्र सरकारने डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर काही महाविद्यालयांना ५० वाढीव जागा मंजूर केल्या आहेत. ही महाविद्यालये पालकांकडून अतिरिक्त रक्कम जमा करायला सांगत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. यात पाच लाख ते १७ लाख रुपयांपर्यंतचे शुल्क आकारत असल्याचे या पालकांकडून नमूद करण्यात आले. तर राज्याच्या वाटय़ाच्या ८५ टक्के जागा फक्त महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठीच राखीव ठेवण्यात याव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, वैद्यकीय शिक्षण संचालनालयातर्फे अद्याप राज्य गुणवत्ता यादी जाहीर न करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाला असल्याचे अनेक पालकांकडून यावेळी सांगण्यात आले. तर महाविद्यालय निवडण्यासाठी प्रवेश प्राधान्य अर्ज भरण्याच्या दोन दिवसाची मुदत देण्याची मागणी यावेळी पालकांकडून करण्यात आली आहे.

मनसेचा पाठिंबा

नीटचा गोंधळ झाल्यानंतर सर्वप्रथम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधत याप्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर आताही मनसे या पालकांच्या मागे उभे असून पक्षातर्फे लवकरच या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेण्यात येणार असल्याचे मनविसेचे सुधाकर तांबोळी यांनी यावेळी जाहीर केले.