मध्य रेल्वेच्या माटुंगा रेल्वे कारशेडमध्ये मंगळवारी सकाळी लागलेल्या आगीत लांब पल्ल्याच्या एका गाडीचा डबा जळून भस्मसात झाला. हा डबा कारशेडमध्ये बाजूलाच पडून होता, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंह यांनी स्पष्ट केले. मात्र या आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले.
माटुंगा येथील मध्य रेल्वेच्या कारशेडमध्ये उभ्या असलेल्या या पेण्ट्री कारच्या डब्याने मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास अचानक पेट घेतला. या आगीची माहिती तातडीने अग्निशमन दलाला दिल्यावर अग्निशमन दलाच्या दोन बंबांनी पंधरा मिनिटांत ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीचे कारण तपासानंतर स्पष्ट होईल, असे सिंह यांनी सांगितले. मात्र प्राथमिक तपासणीनुसार कारशेडमधील कचरा जाळताना ही आग भडकल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा परिणाम उपनगरीय रेल्वेच्या वाहतुकीवर झाला नाही.