मुंबई उपनगर आणि नंदुरबार वगळता एकाही जिल्ह्य़ात पावसाने सरासरी ओलांडलेली नसतानाच जुलैअखेर महाराष्ट्रात पावसाची सरासरीपेक्षा २७ टक्के कमी नोंद झाली आहे. देशातील विभागीय आकडेवारीनुसार पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असलेला मराठवाडा (सरासरीच्या ५६ टक्के कमी) तुटीमध्ये सर्वात पुढे आहे. कोकणात २५ टक्के, मध्य महाराष्ट्रात २६ टक्के, तर विदर्भात १८ टक्के कमी पाऊस पडला आहे. कोमेन वादळाच्या प्रभावामुळे राज्यात पावसाच्या सरी परतण्याचा अंदाज असला, तरी शेतीसाठी सर्वात महत्त्वाचा महिना असलेल्या जुलैमध्ये पावसाने ओढ दिली आहे.
राजस्थान ते प. बंगालपर्यंत निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आणि त्यानंतर राजस्थानवरील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे जुलैच्या दुसऱ्या पंधरवडय़ात उत्तर भारतात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जुलैच्या तिसऱ्या आठवडय़ात सात टक्केपर्यंत गेलेली तूट बरीचशी भरून निघाली होती. मात्र पावसाचा जोर गेल्या तीन दिवसात कमी झाल्याने जुलैअखेर ही तूट पाच टक्क्य़ांवर राहिली. उत्तर भारतातील अनेक राज्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला असला तरी दक्षिण भारतातील आंध्र प्रदेशचा अपवादवगळता एकाही राज्यात पावसाने सरासरी गाठलेली नाही.

आतापर्यंतची सरासरी

’कोकण : १३६२ मिमी
’मध्य महाराष्ट्र : २८८ मिमी
’मराठवाडा : १४६ मिमी
’विदर्भ : ३९२ मिमी
’मुंबई उपनगरे : १४६५ मिमी (सरासरीपेक्षा १३ टक्के जास्त)
’कुलाब्यात सर्वाधिक
११४६ मिमी पाऊस

लातूरमध्ये आठवडय़ाला दोन हरणांचा मृत्यू
दुष्काळाच्या वणव्यात वनक्षेत्राची वाताहत होत असून पाणी व खाद्याच्या शोधात वन्यप्राणी वनक्षेत्रातून बाहेर पडू लागले आहेत. मात्र, त्यामुळेच सैरभैर होऊन त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. राज्यातील सर्वात कमी वनक्षेत्र असलेल्या लातूरसारख्या जिल्हय़ात दर आठवडय़ाला किमान दोन हरणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

जिल्हाभरात गेल्या काही वर्षांत वन विभागाने ५५० कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठय़ात पावसाळय़ात पाऊस पडल्यानंतर पाणी जमा होऊ शकते. पाणी नसलेल्या वेळेत टँकरने पाणी टाकावे लागते.