महाराष्ट्र सदनात खासदारांना चांगले जेवण मिळत नाही म्हणून आवाज उठवणारे खासदार जनतेच्या आक्रोशावर कधी आवाज उठवणार असा सवाल करत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेनेला अंगावर घेऊन आपली ‘राज’कीय वाटचाल स्पष्ट केली. महाराष्ट्राचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण निवडणूक लढवत असून विधानसभेत माझ्या शेजारी बसण्यासाठी शक्तीनीशी निवडणूक लढवा असे आवाहन राज यांनी केले.
लवकरच आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात विकासाची ब्लू प्रिंट दाखवू, असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या फेरीवाला सर्वेक्षणाला विरोध करण्याचे आदेश त्यांनी दिले.
सेना-भाजपचा थेट उल्लेख न करता राज म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या विजयानंतर सध्या ते गुलाबी चित्र रंगवत आहेत. प्रत्यक्षात आता ते जांभळे झाले असून लवकरच हे चित्र काळपट झाल्याचे दिसून येईल. या निवडणुकीत मनसेचा झंझावात तुम्हाला दिसेल असा विश्वास व्यक्त करतानाच सर्वशक्तीनीशी प्रचारात उतरा असे आवाहन कार्यकर्ता मेळाव्यात राज यांनी केले.
मुंबई महापालिकेत सेना-भाजपची सत्ता आहे. आधीच बकाल होत चाललेल्या मुंबईत पालिकेने फेरीवाला सर्वेक्षण सुरु केल्यापासून मोठय़ा संख्येने परप्रांतातून फेरीवाले येत आहेत. मुंबईकरांना चालण्यासाठीही रस्ते नसताना सर्वोच्च न्यायालयात पालिका व राज्य सरकार बाजू तरी काय मांडते, असा सवाल राज त्यांनी केला. या सर्वेक्षणाला मनसे जोरदार विरोध करेल, असे सांगून, आपण फेरीवाल्यांच्या विरोधात नसल्याचे मात्र अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या ज्या वेगाने वाढत आहे ती गंभीर गोष्ट असल्याचे राज म्हणाले. हे सारे परप्रांतीयांच्या मतांचे राजकारण सुरु असून शिवसेना गप्प का, असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱ्याला सेनाखासदाराने चपाती भरवताना त्यांना तो मुस्लिम असण्याचे माहित नसावे असेही राज म्हणाले.