पालिकेच्या स्वच्छतागृहांचा दर्जा नागरिक ठरवणार

खासगी संस्थांना देखभालीसाठी दिलेल्या सार्वजनिक शौचालयांतील स्वच्छतेवर करडी नजर ठेवण्यासाठी पालिकेने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. सार्वजनिक शौचालयांमध्ये रेटिंग यंत्र बसवून नागरिकांच्या माध्यमातून त्यांचा हवाला घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील भाटिया बागेजवळील शौचालयात पहिले रेटिंग यंत्र बसविण्यात आले असून लवकरच मुंबईतील ५० शौचालयांमध्ये ही यंत्रे बसविण्याचा पालिकेचा मानस आहे.

‘स्वच्छ भारत अभियाना’मध्ये पालिकेने ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मुंबईमधील सार्वजनिक शौचालये अस्वच्छ असल्याची टीका कायम नागरिकांकडून करण्यात येते. मात्र आता शौचालये स्वच्छ आहेत की नाही याची माहिती नागरिकांकडूनच मिळविण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. त्यासाठी शौचालयांमध्ये रेटिंग यंत्र पसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या यंत्रावर ‘स्वच्छ’, ‘ठीक आहे’ आणि ‘अस्वच्छ’ असे तीन पर्याय सांगणारी बटने असणार असून नागरिकांनी शौचालयाच्या स्वरूपानुसार पर्यायाचे बटन दाबून आपले मत नोंदवायचे आहे. त्यामुळे शौचालयाची देखभाल योग्य प्रकारे केली जाते की नाही याची माहिती पालिकेला मिळणार आहे.

पालिकेच्या अनेक शौचालये देखभालीसाठी स्वयंसेवी संस्थांना देण्यात आली आहेत. संस्था त्यांची निगा योग्य प्रकारे राखतात की नाही याची पाहणी करण्यासाठी पालिकेची यंत्रणा आहे. मात्र शौचालयांचा वापर करणाऱ्या नागरिकांना त्याबाबत मत नोंदविण्याची सुविधा नव्हती. ही बाब लक्षात घेऊन ‘स्वच्छ अभियाना’अंतर्गत शौचालयांमध्ये आता रेटिंग यंत्रे बसविण्यात येत असल्याची माहिती ‘ए’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. नागरिकांनी नोंदविलेली मते, वेळ आणि दिनांक आदी तपशिलासह सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. अनेक नागरिकांनी एखादे शौचालय कायम अस्वच्छ असल्याचे मत नोंदविल्यास त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे, असेही किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले.