घाऊक व्यापाऱ्यांनी नोटा नाकारल्याने किरकोळ व्यापारी अडचणीत; ग्राहकांची संख्याही रोडावली

पाचशे आणि एक हजार रुपयांचा नोटा चलनातून बाद झाल्यानंतर फॅशनेबल कपडे, चपला, आभूषणे आदींच्या विक्रीकरिता प्रसिद्ध असलेल्या वांद्रे परिसरातील लिंकिंग रोड, एल्को बाजारात गेले आठवडाभर ग्राहकांअभावी शुकशुकाट पसरला आहे. दिवसाला १५ ते २० हजार रुपयांची कमाई करणाऱ्या येथील काही दुकानदारांची कधीकधी ‘बोनी’ही होत नाही गेल्या आठ दिवसांपासून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वांद्रे पश्चिम येथील लिंकिंग रोड, एल्को या बाजारपेठा कायम ग्राहकांच्या गर्दीत हरवलेल्या असतात. केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी नागरिकही येथील फॅशनेबल कपडे, चपला, आभूषणे, बॅगा आदींच्या खरेदीकरिता या बाजारपेठेला पसंती देतात. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाद झाल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला येथील ग्राहकांची संख्या अचानक रोडावली. चिंतातुर झालेल्या दुकानदारांनी सुरुवातीला जे काही ग्राहक येत होते त्यांच्याकडून पाचशे-हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या. परंतु घाऊक विक्रेत्यांनीच जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे येथील किरकोळ व्यापारी अडचणीत आले आहेत.

घाऊक माल मिळत नाही आणि येणारे ग्राहक पाचशे, हजार रुपयांच्या नोटा घेऊन येत आहेत. त्यामुळे काय करायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी चार-पाच तास रांगेत उभे राहणे परवडणारे नसल्याने व्यापाऱ्यांच्या समस्येत वाढ होऊ लागली आहे. परिणामी, त्यांनी ग्राहकांकडून जुन्या नोटा घेणे बंद केले आहे.

गेल्या बुधवारपासून धंद्यात मंदी आली आहे. पूर्वी दिवसाला १५ ते २० हजार रुपयांची कमाई होत होती. परंतु आता दिवसाची कमाई सहा ते सात हजार रुपयांवर घसरली आहे, असे लिंकिंग रोडवरील कपडे विक्रेते शहाफजल कुरेशी यांनी सांगितले. ‘पैसे नसल्याने सध्या ग्राहक खरेदीसाठी येत नाही आहे. रोजी-रोटीचा सवाल असल्याने जे कोणी ग्राहक येतात त्यांच्याकडून आम्ही जुन्या नोटा स्वीकारत होतो. परंतु, घाऊक व्यापारी या नोटा घेत नाहीत. त्यामुळे आम्हीही आता या नोटा स्वीकारणे बंद केले आहे,’ अशी माहिती त्यांनी पुरविली.

येथील आणखी एक व्यापारी जय कुमार यांनी सांगितले की, जुन्या नोटा स्वीकारल्या तरी अडचण आहे. कारण त्या आम्हाला शेवटी बँकेतच भराव्या लागणार. बँकेबाहेरची गर्दी पाहता रांगेत वेळ घालवू की धंदा करू असा प्रश्न आहे.

सोमवारी बँका बंद होत्या तेव्हा एका दमडीची कमाई झाली नाही. नोटाबंदीच्या निर्णयामुळे व्यवसायावर परिणाम होत असून ग्राहकही आता दुकानाकडे पाठ फिरवू लागले आहेत. एरवी बँकेत खाते सुरू करा अशी विनवणी करीत बँकेचे कर्मचारी आमच्याकडे येत होते. परंतु आता त्याच कर्मचाऱ्यांना फोन केला तर ते तो उचलतही नाहीत.

सुनील कुकरेजा, एल्को बाजारातील बॅगविक्रेते