‘मुस्लिम असल्यामुळे नोकरी देता येणार नाही’, असे लेखी कळवून कुल्र्यातील एका तरुणाला नोकरी नाकारणाऱ्या कंपनीला शुक्रवारी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तसेच आता या तरुणाला ईमेल पाठवणाऱ्या एचआर विभागातील शिकाऊ कर्मचाऱ्याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
वांद्रे-कुर्ला संकुल येथील हरे कृष्णा एक्स्पोर्ट या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केलेल्या झीशान खान या तरुणाचा अर्ज फेटाळण्यात आला. अर्ज फेटाळल्याचे सांगणाऱ्या ईमेलमध्ये ‘मुस्लिम असल्यामुळे नोकरी देता येणार नाही’, असेही उद्धृत केले होते. त्यानंतर या संतप्त तरुणाने या ईमेलचा स्क्रीनशॉट घेऊन तो सोशल नेटवर्किंग साइट्सवर टाकला होता. कंपनीने त्याला खासगी ईमेल पाठवत घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती.
आता पोलिसांनी या कंपनीला नोटीस पाठवली आहे. झीशानला पाठवण्यात आलेला ईमेल कोणत्या आयडीवरून पाठवला होता, तो आयडी कोणी उघडला होता आदी गोष्टींबाबतचा खुलासा कंपनीकडून मागवण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे ज्या शिकाऊ कर्मचाऱ्याने उत्तर पाठवले होते, त्या कर्मचाऱ्याची चौकशी होणार आहे, असे पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी सांगितले.
या कंपनीने प्रसारमाध्यमांसाठी पाठवलेल्या पत्रात आपण कसे धर्मनिरपेक्ष आहोत, याचे दाखले दिले आहेत. अल्पसंख्याक समाजातील ५०हून अधिक कर्मचारी आपल्या कंपनीच्या २८ विविध राज्यांतील कार्यालयांत कामाला आहेत, असे या कंपनीने म्हटले आहे.
 नोकरी देताना आतापर्यंत कधीच धर्माच्या आधारावर दुजाभाव करण्यात आला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र झीशानने व्ही. बी. नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.