दोन ठार, चालकाला अटक

वांद्रे उड्डाणपुलावरून भरधाव कार खाली कोसळून घडलेल्या विचित्र अपघातात दोन मजुरांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी घटनास्थळावरून पसार झालेला गाडीचा चालक एत्तेशाम कपाडिया (२५) याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंगरी परिसरात राहाणारा कपाडिया त्याच्या मैत्रीणीसोबत र्शेवलेट कारमधून अंधेरीच्या दिशेने निघाला होता. वांद्रे उड्डाणपुलावरून खाली उतरताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले. कारने उड्डाणपुलाच्या संरक्षक भिंतीवरील होर्डीगची डागडुजी करणाऱ्या संदिप गौड व लाला बन्सी या दोघांना धडक दिली. त्यानंतर संरक्षक भिंत तोडून कार खाली कोसळली. मात्र पुलाखालील झाडासोबत खाली आल्याने कारचा कोसळण्याचा वेग कमी झाला. या अपघातात बन्सी आणि गौड दोघे पुलावरून खाली फेकले गेले. दोघेही गंभीररित्या जखमी होते. गौड याचा जागीच मृत्यू झाला. तर बन्सीचा भाभा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या अपघातात शकील नावाचा पादचारीही किरकोळ जखमी झाला.

अन्य पादचाऱ्यांनी कारमधील कपाडीया व त्याच्या मैत्रीणीला सुखरूप बाहेर काढले. कारमधील एअर बॅगमुळे दोघांचा जीव वाचला, असे पोलिसांनी सांगितले. कारमधून बाहेर पडल्यावर दोघे रिक्षात बसून पसार झाले. कारमधील कागदपत्रांवरून पोलिसांनी कपाडियाला शोधून काढले आणि ताब्यात घेतले. वरिष्ठ निरीक्षक पंडित ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार निष्काळजीपणे वाहन चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कपाडियाला अटक करण्यात आली.