कोकणात सातत्याने रस्ते अपघात होत आहेत, परंतु रुग्णालये नसल्याने जखमींना वेळेवर उपचार मिळत नाहीत, या विरोधी पक्ष सदस्यांनी मांडलेल्या समस्येवर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी डॉक्टरांच्या नियुक्त्यांचा प्रश्न उपस्थित केल्याने त्याला शिवसेनेचे रामदास कदम यांनी आक्षेप घेतला. हा कोकणाचा अपमान असल्याचा आरोप कदम यांनी केल्यामुळे फौजिया खान व रामदास कदम यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.  
विधान परिषदेत मंगळवारी आरोग्य विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, डॉ. दीपक सावंत, रामदास कदमआदींनी  कोकणातील वाढत्या अपघातांबद्दल आणि वैद्यकीय उपचारांच्या गैरसोयींबद्दलचा मुद्दा उपस्थित केला होता.
त्यावर कोकणात ‘ट्रॉमा केअर युनिट’ उभारण्यात येत असून या भागात सुसज्ज रुग्णालयाची आवश्यकता आहे. परंतु डॉक्टरांच्या नियुक्त्यांचा प्रश्न आहे, असे फौजिया खान यांनी सांगितले.
अधिकचा आर्थिक लाभ देण्याची सरकारची तयारी असूनही कुणी डॉक्टर मिळत नाही, असे फौजिया खान म्हणाल्या. त्यावर हा कोकणाचा अपमान अशल्याचा आक्षेप रामदास कदम यांनी आक्षेप घेतला.
फौजिया खान यांनी मात्र आपण वस्तुस्थिती मांडत आहोत, असे सांगताच रामदास कदम, दीपक सावंत व भाई गिरकर यांनी त्यांच्या उत्तराच्या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
फौजिया खान आणि रामदास कदम यांच्यात बरीच वादावादी झाली. पीठासन अधिकारी मोहन जोशी यांनी हा वाद थांबविण्याचा प्रयत्न केला. शेवटी फौजिया खान यांनीच आपले भाषण अटोपते घेतले.