‘मातोश्री’चे स्मारक करा : काँग्रेस *  इंदू मिलसारखी भव्य जागा हवी : मनसे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तृतीय स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या स्मारकाचा रेंगाळलेला प्रश्न राज्य सरकारने मार्गी लावला असला, तरी लगेचच त्यात मतभेदांचा शिरकाव झाल्याने स्मारकाच्या मुद्दय़ावर राजकारण रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबईच्या प्रथम नागरिकाचे निवासस्थान जिजामाता उद्यान या प्राणीसंग्रहालयात हलवून सध्याच्या महापौर निवासस्थानाच्या परिसरात बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेस काँग्रेस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार आक्षेप घेतला आहे.
बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची विस्तृत जागा निवडणाऱ्या राज्य सरकारने बाळासाहेबांच्या स्मारकासाठीही तशीच भव्य जागा निवडायला हवी, असे सांगत राज ठाकरे यांनी महापौर निवासावरील स्मारकाच्या योजनेस विरोध केला. स्मारकाच्या नावाखाली शिवसेनेचा महापौर निवासावर डोळा असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला.
काँग्रेसने तर थेट ‘मातोश्री’ विकत घेऊन तेथे स्मारक उभारण्याचा सल्ला सरकारला दिला. लंडनमधील बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान विकत घेऊन राज्य सरकारने तेथे बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे ठरविले, त्याच पद्धतीने बाळासाहेबांचे निवासस्थान असलेला ‘मातोश्री’ बंगला विकत घेऊन तेथेच स्मारकाचा प्रकल्प राबवावा, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला सुचविले.
काँग्रेस आणि मनसेने घेतलेल्या या आक्षेपांमुळे, महापौर निवासाच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याच्या सरकारच्या योजनेस पहिल्या पावलातच अडथळे उभे राहिले असून, आता राज्य सरकार त्यातून कसा मार्ग काढणार, याकडे साऱ्या नजरा एकवटल्या आहेत. तसेच ऐतिहासिक वारसा वास्तूचा दर्जा असलेल्या या इमारतीच्या परिसरात सागरीकिनारा नियंत्रण नियमाच्या चौकटीत राहून स्मारक उभारण्याची कसोटी राज्य सरकार कशी पार पाडणार, याकडेही सर्वाचे लक्ष लागले आहे.

न्यासाच्या अध्यक्षपदी उद्धव : शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी सरकारच्या आधिपत्याखाली एक सार्वजनिक स्मारक न्यास स्थापन करण्यात येणार असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्याचे अध्यक्ष असतील, असेही मुख्यमंत्र्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले. सरकारने स्मारकाबाबत निर्णय घेतल्याने उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.