राज्य सरकारच्या धोरणांवर खापर फोडत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी यंदाची दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी दुपारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. राज्य सरकारने कायद्यात बदल केला किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयांना स्थगिती मिळवली तरच हा उत्सव साजरा करण्याचा फेरविचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. वरळीमध्ये सचिन अहिर दरवर्षी संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव साजरा करतात.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे आणखी एक नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता सचिन अहिर यांनी देखील हा उत्सव साजरा न करण्याचे ठरविले आहे.
सचिन अहिर यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. राज्य सरकारच्या धोरणात एकवाक्यता नाही. एकीकडे साहसी खेळामध्ये दहीहंडीचा समावेश केला गेला असताना दुसरीकडे त्यावर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे यावर्षी उत्सव न साजरा करण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी सांगितले.