सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांमध्ये भटकंतीच्या निमित्ताने नियमित राबता असणाऱ्या गिरीमित्रांना वाडय़ा-वस्त्यांवरील स्थानिक बरीच मदत करीत असतात. त्यांच्या घराच्या पडव्या या शहरी पाहुण्यांसाठी सदैव स्वागतोत्सुक असतात. कोणतीही अपेक्षा न बाळगता सह्य़ाद्रीपुत्रांकडून नेहमीच मिळत असलेल्या सर्वतोपरी मदतीचे काही प्रमाणात का होईना पण उतराई व्हावे या हेतूने आता ‘शिव-सह्य़ाद्री’ या हौशी गिर्यारोहकांच्या समूहाने तेथील शाळांमधील मुलांसाठी उत्तम पुस्तकांचा समावेश असलेली छोटी ग्रंथालये भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेला राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाजेघर गावातील शाळेत पहिले ग्रंथालय देऊन या उपक्रमाची सुरुवात झाली.
दुर्गम भागातील या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठीही बरीच कसरत करावी लागते. कारण या भागात ना धड रस्ते आहेत ना वाहतुकीची साधने. टी.व्ही., इंटरनेट या आधुनिक माहिती केंद्रांचाही या भागात अभाव आहे. त्यामुळे किमान चांगल्या पुस्तकांच्या माध्यमातून आधुनिक ज्ञानगंगा या भागात पोहोचावी, या हेतूने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला आहे.  येत्या महिना-दोन महिन्यांत अशा प्रकारे सह्य़ाद्री परिसरातील किमान दहा शाळांमध्ये ग्रंथालये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिव-सह्य़ाद्री संस्थेचे रवी पवार यांनी दिली. तसेच पुढील वर्षी सह्य़ाद्री परिसरातील शंभर शाळांमध्ये अशा प्रकारे वाचन संस्कृती नेण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. किशोरवयीन मुला-मुलींना आवडणाऱ्या, त्यांच्या क्रमित अभ्यासक्रमास पूरक ठरणाऱ्या तसेच भावी आयुष्यात प्रेरणादायी ठरू शकणाऱ्या किमान ३०० पुस्तकांचा समावेश या ग्रंथालयात असणार आहे. या ग्रंथालय उपक्रमासाठी इच्छुकांनी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहनही ‘शिव-सह्य़ाद्री’च्या वतीने करण्यात आले आहे.  
मोबदला नव्हे कृतज्ञता
गेली अनेक वर्षे आम्ही गिर्यारोहणाच्या निमित्ताने सह्य़ाद्रीच्या डोंगररांगा भटकत आहोत. या प्रवासात आम्ही डोंगरालगतच्या वस्तीतील कुणाच्याही पडवीत आमचे सामान टाकतो. तिथे कुणी आम्हाला अडवत नाही. उलट वाटाडय़ा म्हणून स्थानिक आम्हाला मदत करतात. भरपेट जेवायला घालतात. रात्री-अपरात्री संकटसमयी मदतीला धावून येतात. त्याचा मोबदला म्हणून नव्हे तर कृतज्ञता म्हणून त्यांच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा एक छोटा प्रयत्न या ग्रंथालयांच्या निमित्ताने आम्ही करीत आहोत, अशी माहिती शिव-सह्य़ाद्रीचे पंकज समेळ यांनी दिली.