कला परीक्षेची प्रमाणपत्रे न दिल्याने १५ गुणांपासून वंचित; निधी न दिल्याच्या रागातून शाळेचे कृत्य?

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे दहावीच्या कला परीक्षेबाबतची पुरेशी प्रमाणपत्रे शाळा प्रशासनाने जमा न केल्यामुळे दहावी उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थिनीने अतिरिक्तच्या १५ गुणांना मुकावे लागल्याचा आरोप केला आहे. बोरिवलीतील सेंट अ‍ॅन्स शाळेच्या विकासनिधीला पैसे न दिल्यामुळे शाळा प्रशासनाने जाणूनबुजून कला परीक्षेची प्रमाणपत्रे मंडळाकडे जमा केली नाहीत, असे विद्यार्थिनीच्या पालकांचे म्हणणे आहे. मात्र शाळेने हा आरोप फेटाळून लावला आहे.

बोरिवलीच्या सेंट अ‍ॅन्स या मुलींच्या शाळेने इमारत दुरुस्तीसाठी पालकांकडे फेब्रुवारी-मार्च दरम्यान पाच हजार रुपये निधीची मागणी प्रत्येक विद्यार्थिनीकडे केली होती. काहींच्या पालकांनी पैसे भरण्यास नकार दिला. त्यामुळे या शाळेने संबंधित विद्यार्थिनीच्या गुणपत्रिका रोखून ठेवल्या होत्या. त्याविरोधात पालकांनी शाळेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. आता याच शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेच्या निधीकरिता पाच हजार रुपये भरले नाहीत म्हणून तिची कलागुणासाठीची आवश्यक ती प्रमाणपत्रे राज्य शिक्षण मंडळाकडे सादर   न केल्याचा आरोप केला आहे. या शाळेतील पूर्वा गावडे या विद्यार्थिनीच्या पालकांनी हा आरोप केला आहे.

पूर्वाला दहावीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळाले आहेत. तबला शिकणाऱ्या पूर्वाने त्यासाठीच्या चार परीक्षा देऊन ती त्यात उत्तीर्णही झाली होती. त्याकरिता तिला १५ गुण मिळायला हवे होते. मात्र शाळेने तिच्या चारही परीक्षांची उत्तीर्णतेची प्रमाणपत्रे मंडळाकडे जमा न केल्याने तिला या गुणांना मुकावे लागल्याची तक्रार तिची आई प्रीती गावडे यांनी केली आहे. गावडे आपले गाऱ्हाणे घेऊन राज्य शिक्षण मंडळाकडे गेल्या असता त्यांना पश्चिम मुंबईच्या विभागीय शिक्षण निरीक्षकांकडे तक्रार करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार आम्ही लेखी तक्रार करणार आहोत, असे गावडे यांनी सांगितले.

आकसापोटी कारवाई

‘शाळेला निधी न दिल्यामुळे माझ्या मुलीसह अन्य मुलींनाही शेवटचे वर्ष असूनही शाळेच्या निरोप समारंभाला हजर राहू दिले गेले नाही. आताही कला परीक्षेची प्रमाणपत्रे मंडळाकडे पाठवण्याची जबाबदारी शाळेची होती. मात्र त्या अधिकाराचा गैरवापर करत आकसापोटी माझ्या मुलीचे प्रमाणपत्र शाळेने पाठवलेले नाही,’ असा आरोप प्रीती गावडे यांनी केला.

पालकांचा आडमुठेपणा

पालकांच्या आरोपांबाबत सेंट अ‍ॅन्स शाळेच्या मुख्याध्यापिका रोझरी एल. यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. आम्ही पालकांकडे शाळेच्या दुरुस्तीसाठी पाच हजार रुपये रक्कम मागितली होती, मात्र काही पालकांनी आडमुठेपणा करत शाळेला काहीच मदत केली नाही. त्यामुळे पैसे न भरलेल्या विद्यार्थिनींना शाळेच्या कार्यक्रमाला येण्याची परवानगी नाकारण्यात आली. मात्र  प्रमाणपत्र जमा करून घेतले नाही, या आरोपात काही तथ्य नाही. पालकांची शाळेविरोधात काही तक्रार असल्यास त्यांनी प्रत्यक्ष येऊन भेटावे, असेही त्या म्हणाल्या.

नियम काय?

शास्त्रीय गायन, नृत्य, वादन यासाठी सवलतींच्या गुणांसाठी यांमधील पाच वर्षे शिक्षण आवश्यक आहे. त्यातील तीन परीक्षा उत्तीर्ण केल्यास १० गुण, पाच परीक्षा उत्तीर्ण केल्यास १५ गुण मिळतात. राष्ट्रीय, राज्यस्तरीय पारितोषिक शिष्यवृत्तिधारकाला २५ गुण देणे बंधनकारक आहे.

राज्य सरकारच्या ५ जानेवारी, २०१७च्या आदेशानुसार शाळा आम्हाला विद्यार्थ्यांचे कला व क्रीडा गुणांबाबतचे प्रस्ताव पाठवते. आम्ही तपासणी करून त्यानुसार गुणदान करतो. यंदा हे प्रस्ताव पाठवण्याची शेवटची तारीख २७ मे होती. त्या कालावधीत प्रस्ताव पाठवला असल्यास त्या विद्यार्थिनीला गुण मिळणे आवश्यक होते.

दत्तात्रय जगताप, संचालक, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ