विधानसभेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना मुख्य विरोधी पक्षाच्याच भूमिकेत पहायला मिळेल, असे शिवसेनेचे माजी प्रवक्ते संजय राऊत यांनी रविवारी सांगितले. त्यामुळे शिवसेना-भाजप यांच्या एकत्र येण्याविषयी पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या आदेशानंतर शनिवारी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चाही केली होती. दोन्ही पक्षांत तडजोड झाल्यावर १ ते ७ डिसेंबरदरम्यान मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचे सांगितले जात होते. राज्यात फडणवीस आणि केंद्रीय पातळीवर अरुण जेटली आणि धर्मेद्र प्रधान हे शिवसेनेशी बोलणी करणार असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळाली होती. तर दुसरीकडे, राज्याचे पाटबंधारे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील शनिवारी कोल्हापुरमध्ये हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेला मंत्रिमंडळात सामावून घेतले जाणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात अखेर समेट घडून येईल, अशी चिन्हे दिसत होती.
मात्र, राऊत यांनी सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या चर्चेबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. आतापर्यंतची परिस्थिती पाहता तरी हिवाळी अधिवेशनात शिवसेना राज्यातील विविध प्रश्नांवरून सरकारला धारेवर धरणार असल्याचे राऊत यांनी म्हटले. सध्या राज्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर असणारे शिवसेना आमदार अधिवेशनात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.